गोंदियाच्या नवेगाव पार्क वन क्षेत्रात गेल्या १५ दिवसांपासून हैदोस घालणारा नरभक्षक प्राणी पट्टेदार वाघ नसून पूर्ण वाढ झालेला बिबटा आहे. या नरभक्षक बिबटय़ाने आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वंदना मेश्राम या महिलेचा बळी घेतल्याने संपूर्ण परिसरात दहशत आणि वन विभागाविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. सडक अर्जुनी परिसरात राहणाऱ्या या महिलेला बिबटय़ाने आज लक्ष्य केले. त्याला पकडण्यासाठी सहा पिंजरे लावल्यानंतरही तो मुक्तपणे फिरत असून त्याने आतापर्यंत चार महिलांचे बळी घेतले आहेत. तो सातत्याने हुलकावणी देत असल्याने वन विभागही हतबल झाला आहे. या नरभक्षक बिबटय़ाला पकडण्यासाठी गोंदियातील रहिवासी आणि लोकप्रतिनिधींचा प्रचंड दबाव वन विभागावर आहे. बिबटय़ाच्या दहशतीने लोकांचे घरातून बाहेर पडणे बंद झाले आहे. सायंकाळी सहानंतर तर लहान मुले, महिलांना घरातच बसून राहावे लागते. रात्रीच्या वेळी रस्त्यावर जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे आहे. बिबटय़ाने तिघींचा बळी घेतल्यानंतर राज्याचे मुख्य वन्यजीव संरक्षक एस.डब्ल्यू.एच. नकवी यांनी त्याला गोळ्या घालण्याचे आदेश जारी केले.
बिबटय़ाच्या हल्ल्यात १५ डिसेंबरला छाया देशपांडे (५०), २४ डिसेंबरला मुक्ताबाई गणवीर (४८) आणि २९ डिसेंबरला मीराबाई बाहेकर (४८) यांचे बळी गेले. त्यामुळे तीन कुटुंबांवर संकटाची कु ऱ्हाड कोसळली आहे. आज मेश्राम कुटुंबावर संकट कोसळले. नवेगाव पार्क परिसरातच या बिबटय़ाचे वास्तव्य असून एक तर त्याला पकडणे किंवा गोळ्या घालून ठार करणे हे दोनच पर्याय वन विभागापुढे आहेत. या बिबटय़ाला नरमांसाची चटक लागल्याने तो दबा धरून केव्हाही हल्ला करतो. त्याला गोळ्या घालण्यासाठी सहा शार्प शूटरचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. त्याला ट्रँक्विलायझरने बेशुद्ध करून पकडण्याला प्राथमिकता दिली जाणार असली तरी प्रसंग उद्भवल्याने त्याला गोळ्या घातल्या जातील, असे नकवी यांनी स्पष्ट केले. दरम्यान नरभक्षक समजून अन्य बिबटय़ाला गोळ्या घातल्या जातील, अशी शंका वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार नवेगाव बांध, लाखांदूर, साकोली आणि अर्जुनी मोरगाव या परिसरात तीन महिलांवर बिबटय़ाने हल्ला केला आहे. या जंगल क्षेत्रात पट्टेदार वाघ आणि बिबटादेखील वास्तव्यास असल्याने नरभक्षकाबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्याला प्राधान्य द्यावे, असे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.  
गोंदियातील लोकप्रतिनिधी आता संतप्त झाले असून बिबटय़ाला लवकरात लवकर जेरबंद न केल्यास जनतेला कायदा हाती घ्यावा लागेल, असा इशारा आमदार नाना पटोले यांनी वन विभागाला दिला आहे. भंडारा आणि गोंदिया दोन्ही जिल्ह्य़ांतील वनांना लागून असलेल्या गावांशेजारी बिबटय़ाचा धुमाकूळ सुरू आहे. जनतेत प्रचंड दहशत आहे. शेतक ऱ्यांनी शेतात जाणे बंद केले आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करून वन विभागाने वाघाला जेरबंद करावे. त्यांच्या पद्धतीने बिबटय़ाचा बंदोबस्त करावा. लोकांच्या भावनेचा अंत पाहू नये. आपण या परिसरातील विविध गावांना भेटी देऊन जनतेला संयम बाळगण्याचा सल्ला देत असल्याने सर्वसामान्य नागरिक गप्प आहे. उद्या त्यांना कायदा हाती घेऊ देण्याची वेळ वन विभागाने येऊ देऊ नये, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा