सांगली : वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागासाठी १११ उमेदवार रिंगणात असून मतदान होणार की अविरोध निवडणूक होणार याकडे लक्ष लागले आहे. या निमित्ताने दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणाच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे दिसत आहे.
वसंतदादा साखर कारखाना सध्या दत्त इंडिया कडून भाडेकरारावर चालविला जात असला तरी नजीकच्या काळात म्हणजे येत्या दोन वर्षात कराराची मुदत संपणार आहे. या नंतर कारखान्याचा पूर्ण कारभार संचालक मंडळाच्या ताब्यात येणार असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.
कारखान्याचे ३६ हजार सभासद असून सांगली, मिरज, आष्टा, भिलवडी, तासगाव या पाच गटातून प्रत्येकी ३ असे १५, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था मतदार गटातून दोन, महिला दोन आणि अनुसूचित जाती जमाती गटातून एक, भटयया व विमुक्त जाती जमातीमधून एक आणि विशेष मागास प्रवर्गमधून एक असे २१ संचालक निवडून द्यायचे आहेत.
उमेदवार अर्जाची छाननी मंगळवारी झाली असून २१ जागासाठी १११ उमेदवार रिंगणात उरले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत २५ फेब्रुवारी अखेर आहे. यानंतर अंतिम उमेदवारांची यादी दि. २७ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास ९ मार्च रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीसाठी वसंतदादा घराण्यातील चौथ्या पिढीचे वारसदार राजकारणात सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. वसंतदादांचे नातू माजी केंद्रिय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.