हर्षद कशाळकर
अलिबाग : रायगड जिल्ह्यात करोनाच्या चौथ्या लाटेत लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. व्यापक प्रमाणात झालेल्या लसीकरणामुळे जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून, या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. जिल्ह्यात चौथ्या लाटेत एकाच रुग्णाचा आत्तापर्यंत मृत्यू झाला असून त्यांनी करोना प्रतिबंधक लस घेतली नसल्याची बाब समोर आली आहे.
मे महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात करोनाच्या चौथ्या लाटेला सुरुवात झाली. सुरुवातीला पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांचे प्रमाण अधिक होते. नंतर जिल्ह्यातील शहरी- निमशहरी भागातही करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. आता पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र त्याच वेळी ग्रामीण भागात रुग्णवाढीचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यात सध्या सरासरी २०० रुग्ण आढळून येत आहेत. दररोज दीड ते तीन हजार रुग्णांच्या करोना चाचण्या केल्या जात आहेत. यात रुग्णवाढीचा दर हा सात टक्क्यांच्या आसपास आहे. ग्रामीण भागात होणारी रुग्णवाढ ही चिंतेची बाब असली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण नगण्य आहे. जिल्ह्यात व्यापक प्रमाणात झालेले करोना प्रतिबंधात्मक लसीकरण यास कारणीभूत आहे.
जिल्ह्यात ९७ टक्के लोकांनी करोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळे करोनाचा सामना करण्यासाठी रुग्णांना चांगली मदत होत आहे. चौथ्या लाटेत आत्तापर्यंत जिल्ह्यात एका ६० वर्षीय रुग्णाचा करोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. ज्यांनी करोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती त्यामुळे ज्या व्यक्तींचे अद्याप लसीकरण झालेले नाही अथवा ज्यांनी तिसरा डोस घेतलेला नाही त्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
६० वर्षांवरील सर्व नागरिकांना प्रिकॉशनरी डोस मोफत दिले जात आहेत. तर १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे.
जिल्ह्यातील करोना रुग्णांची आजची स्थिती
जिल्ह्यात सध्या करोनाचे ८८७ सक्रिय रुग्ण आहेत. ज्यापैकी केवळ २३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यापैकी केवळ पाच जणांना प्राणवायू पुरवठा करावा लागत आहे. जिल्ह्यात कृत्रिम श्वासोच्छ्वासावर एकही रुग्ण नाही. तसेच एकाही रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले नाही.
लसीकरण स्थिती
– पहिला डोस घेतलेले- २२ लाख ०५ हजार २१०
– दुसरा डोस घेतलेले- २१ लाख ११ हजार ८२६
– प्रिकॉशन डोस घेतलेले – १ लाख ९ हजार ०२१
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात लसीकरण महत्त्वाची भुमिका बजावत आहे. लसीकरण केलेल्या रुग्णांना करोनाची लागण होत असली तरी त्यांच्यात कुठलीही गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यांना ऑक्सिजनची गरजही लागत नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घ्यायला हवे.
– डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक