अलिबाग – वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश देतो सांगून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पश्चिम बंगाल येथून चौघांना अटक करण्यात आली असून, आणखी तिघांचा शोध सुरू आहे.
कोल्हापूर येथे राहणाऱ्या अभिजीत वानिरे यांना अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला प्रवेश मिळवून देतो असे सांगून आरोपींनी ३२ लाख ५० हजार रुपये रकमेची मागणी केली होती. अलिबाग येथील रविकिरण हॉटेल येथे ही रक्कम आरोपींनी स्वीकारली. नंतर दिलेली रक्कम घेऊन ते पसार झाले. आरोपींचा संपर्क होत नसल्याने फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा – गोष्ट असामान्यांची Video: …म्हणून हा इंजिनिअर झाला कोकणी रानमाणूस
गुन्ह्याचे गांभीर्य आणि गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम मोठी असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के यांच्या नेतृत्वाखाली एका तपास पथकाचे गठन केले होते. सायबर पोलीस ठाण्याचे एक पथक त्यांना सहकार्य करत होते. सायबर पोलिसांनी सीडीआर आणि डंप डाटा यांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेतला यानंतर ते कुठे जात आहेत याची माहिती संकलित केली.
पश्चिम बंगालमधील दिघा पूर्व मेदिनीपूर येथे पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के आणि त्यांचे पथक रवाना झाले. मात्र पोलीस आले आहेत समजताच आरोपींनी पळ काढण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांचा पाठलाग करून पोलिसांनी वाहनांसह चौघांना ताब्यात घेतले. सौरभ सौम्य दास, सोमेन सुधांशू मन्ना, सोमेश वीरेंद्रनाथ बिरा, अभिषेककुमार दिलीप राजा अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांना आठ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. त्यांच्याकडून २० लाख रुपयांची रोकड, एक गाडी आणि मोबाईल फोन्स जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान या गुन्ह्यातील अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे. तपासात पोलीस उपनिरीक्षक विशाल शिर्के पोलीस हवालदार अमोल हंबीर, प्रतीक सावंत, सचिन वाडेकर, ईश्वर लांबोटे, सायबर सेलचे तुषार घरत आणि अक्षय पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देतो सांगून फसवणूक होण्याची गेल्या वर्षभरातील ही दुसरी घटना आहे, त्यामुळे नागरिकांनी अशा लोकांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.