कराड :  भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाला तब्बल ९० लाख रुपयांचा गंडा घातला गेला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोन सख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद कराडच्या मंगळवार पेठेतील सुरज विष्णू साळुंखे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार नवीनकुमार सावंत व महेशकुमार सावंत ( दोघेही रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुरज साळुंखे हे चांदीचा व्यवसाय करतात. व्यवसायानिमित्त ते आंध्रप्रदेशमध्ये गेले असता त्यांची तिथे भिकवडी येथील नवीन सावंत याच्याशी ओळख झाली. त्यानंतर नवीनने सुरज यांना कराडमध्ये दुकान सुरू करणार असल्याचे सांगून पैशाची मागणी केली. तसेच भागीदारीत व्यवसाय सुरू करू, असेही सांगितले.

हेही वाचा >>>सांगली : संशयित आरोपीचे बेडीसह पलायन

सुरज यांनी या प्रस्तावाबाबत नवीनचा भाऊ महेश याच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर सोन्याचे दागिने गहाण ठेवून १५ लाख, तसेच स्वत:जवळील १५ लाख असे ३० लाख रुपये सुरज यांनी नवीनला दिले. १६ जानेवारी २०२२ रोजी हा व्यवहार झाला. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये महेश व नवीन दोघेही सुरज यांच्या कराडमधील दुकानात आले. त्यावेळी सुरज यांनी चांदीबाबत विचारणा केली. मात्र, चांदीसाठी आणखी १० लाख रुपयांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार सुरज यांनी १० लाख रुपये दिले. त्याबरोबरच जास्तीत जास्त चांदी आणायची असेल, तर आणखी ३० लाख रुपयांची जुळणी कर, असेही त्या दोघांनी सांगितले. त्यामुळे सुरज यांनी त्यांच्या मित्राकडून आणखी ३० लाख रुपये घेऊन नवीन आणि महेशला दिले. त्यानंतर आणखी १०  लाख रुपये नवीनच्या बँक खात्यावर भरण्यात आले.

दि. ६ सप्टेंबर २०२१ पासून आजअखेर सुरज साळुंखे यांनी नवीन व त्याचा भाऊ महेश या दोघांना एकूण ९०  लाख रुपये दिले. मात्र, एवढे पैसे देऊनही त्या दोघांनी सुरज यांना चांदी आणून दिली नाही. तसेच भागीदारीत व्यवसायही सुरू केला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सुरज साळुंखे यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करत आहेत.