दर्यापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील टीएमसी इमारतीचे बांधकाम करताना बनावट दस्तावेज तयार करून १ कोटी २० लाख रुपयांची अफरातफर केल्याच्या तक्रारीच्या आधारे बाजार समितीचे माजी सभापती अरुण गावंडे, माजी बांधकाम सभापती बळवंत वानखडे यांच्यासह कंत्राटदाराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
गैरव्यवहाराविषयी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती साहेबराव भदे यांनी दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. २००४ ते २००९ पर्यंत अरुण गावंडे सभापती म्हणून, तर बळवंत वानखडे बांधकाम सभापती होते. त्यांच्या कार्यकाळात टेक्नॉलॉजी मिशन कॉटन (टीएमसी) योजनेअंतर्गत बांधकामासाठी २ कोटी १० लाख रुपयांची रक्कम पणन संचालकांकडून बाजार समितीला प्राप्त झाली होती.
या बांधकामाच्या वेळी तत्कालीन बांधकाम सभापतींनी कंत्राटदार खरे व तारकुंडे कंपनी, वास्तूतज्ज्ञ इश्वर वैद्य यांनी संगनमत करून १ कोटी रुपयांचे खोटे दस्तावेज तयार करून अफरातफर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक आणि सहनिबंधकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला पत्र पाठवून फौजदारी कारवाई करण्याची सूचना केली होती. संचालक मंडळाने अखेर ठराव करून पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
अरुण गावंडे आणि बळवंत वानखडे यांनी खरे व तारकुंडे कंपनीला बांधकाम करण्याचे कंत्राट दिले. या प्रकल्पामधील बी.टी. शेडचे मंजूर क्षेत्र ५ हजार ५४० चौरस मीटर होते. खाते निविदा काढताना ८ हजार २४० चौ.मी. क्षेत्र दर्शवण्यात आले. प्रत्यक्षात काम फक्त ४ हजार ३९४ चौ.मी.चे झाले असताना तत्कालीन सभापती, बांधकाम सभापती आणि कंत्राटदारांनी संगनमत करून ४ हजार २४० चौ.मी. क्षेत्राचे बिल काढले. प्लॅटफॉर्म, एफआरए बिल्डिंग, जमिनीचे सपाटीकरण, रस्ते आणि इतर कामांमध्ये निविदा, प्रत्यक्ष झालेले काम आणि वसूल करण्यात आलेले बिल यात मोठय़ा प्रमाणावर तफावत दिसून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एका कामात तर दोन वेळा कामे झाल्याचे दाखवून बिल उकळण्यात आले. कंत्राटदार आणि वास्तूतज्ज्ञांनी संगनमत करून स्वत:च्या फायद्यासाठी आर्थिक अफरातफर केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.