तुळजापूर पालिकेच्या व भाडय़ाने आणलेल्या वाहनांच्या इंधनावर कसलीही प्रशासकीय मान्यता न घेता तब्बल ६० लाख ६७ हजार १४१ रुपये नियमबाह्य खर्च केल्याचे दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्या तुळजापूर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई गंगणे व संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करावी. माजी नगराध्यक्षा गंगणे यांच्या कार्यकाळातच नियमबाह्यरीत्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम वर्ग करून भ्रष्टाचार झाला. या प्रकरणी चौकशी करून माजी नगराध्यक्षा व संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक नागनाथ भांजी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
पालिकेच्या २०१३-१४ च्या लेखापरीक्षण अहवालानुसार माजी नगराध्यक्षा गंगणे यांच्या काळात पालिकेने इंधनावर ६० लाख ६७ हजार १४१ रुपये खर्च दाखविला. या खर्चाच्या कागदपत्रांची लेखापरीक्षकांनी लेखी व तोंडी मागणी करूनही त्यांना पालिकेने इंधन कधी, कोणत्या वाहनांत, ते वाहन पालिकेचे की खासगी होते या बाबत माहिती देण्यात आली नाही. वाहनाचे लॉगबुक, बँक पासबुकही दाखविले नाही. पालिकेकडे असलेल्या वाहनांची संख्या व पेट्रोल, डिझेल, ऑईल खरेदी रकमेत मोठी तफावत आढळून आली. लेखापरीक्षणापासून मोठा भ्रष्टाचार लपविण्यासाठी पालिकेने सहायक संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालयास इंधनाबाबतचे सर्व पुरावे सादर केली नाहीत.
या बरोबरच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात नियमबाह्य, कसलीही प्रशासकीय मान्यता न घेता तब्बल २४ लाख रुपये पालिकेच्या अन्य खात्यात वर्ग करण्यात आल्याचेही उघडकीस आले. पालिकेने खर्चाच्या बाबतीत गंभीर अनियमितता केली. गंगणे व लेखापालाने देयके आल्यानंतर देयकाची अचूकता, अनुषंगिक कागदपत्रांची खात्री करून देयके पारित केली नाही. यावरून गंगणे यांच्या काळात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक भांजी यांनी मुख्यमंत्री व नगरविकास विभागाचे सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
‘तुळजापूर पालिकेच्या इंधन खर्चात भ्रष्टाचार’
तुळजापूर पालिकेच्या व भाडय़ाने आणलेल्या वाहनांच्या इंधनावर कसलीही प्रशासकीय मान्यता न घेता तब्बल ६० लाख ६७ हजार १४१ रुपये नियमबाह्य खर्च केल्याचे दाखवून भ्रष्टाचार करणाऱ्या तुळजापूर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा विद्याताई गंगणे व संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करावी.
First published on: 31-07-2015 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud in fuel debit in tuljapur corporation