तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने चालविल्या जात असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात पाऊण कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून महाविद्यालयाचे अंतर्गत लेखा परीक्षण करण्यात आले. त्यानुसार महाविद्यालयातील अनेक गरव्यवहार चव्हाटय़ावर आले आहेत. या प्रकरणी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एम. पी. चव्हाण, लेखापाल िदडोरे या दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला. सध्या ते फरारी आहेत.
तुळजाभवानी महाविद्यालयातील तक्रारी, आर्थिक अनियमिततेचे प्रकार वेळोवेळी समोर आल्यामुळे मंदिर संस्थान अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी महाविद्यालयाचे अंतर्गत लेखापरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लेखाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. महाविद्यालयाचे बँकेतील खाते व कॅशबुक यात तब्बल ३० लाखांची तफावत आढळून आली. दैनंदिन रोजकीर्दमध्ये अनेक बाबींचे पुनर्लिखाण केल्याचा गंभीर आक्षेपही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त २९ लाख ५० हजार रुपयांची रोकड वापरल्याचे समोर आले. प्रत्यक्षात ही रक्कम दाखविण्यास महाविद्यालय प्रशासन असमर्थ ठरले. अनेक प्राध्यापकांना वेगवेगळ्या कामांसाठी अग्रीम म्हणून मोठी रोकड देण्यात आली. त्यातील अनेकांनी ही रोकड कशासाठी घेतली, त्याची माहिती अजूनही महाविद्यालय प्रशासनास सादर केली नाही. लेखापरीक्षकांनी नोंदविलेल्या आक्षेपानंतर अनेक प्राध्यापकांनी आगाऊ म्हणून उचललेली रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे.
महाविद्यालय ग्रंथालयातही अनेक गरव्यवहार झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी ज्या वर्षी पाच लाख रुपयांच्या पुस्तकांची खरेदी झाली, त्याच वर्षी ५ लाख रुपये किमतीची पुस्तके रद्दीत काढल्याचे तपासणीत समोर आले. या शिवाय समाजकल्याण विभागाकडून महाविद्यालयास दिलेल्या पुस्तकांचा ताळमेळही महाविद्यालय प्रशासनाकडे उपलब्ध नाही. ग्रंथालयाप्रमाणे प्रयोगशाळांमध्येही अशाच प्रकारे अनेक त्रुटी असल्याचे अहवालात म्हटले आहे.
तपासणीनंतर कारवाई- डॉ. नारनवरे
लेखापरीक्षकांच्या अहवालात अनेक गंभीर आक्षेप आहेत. प्राधान्याने दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील आक्षेपांची तपासणी सुरू आहे. तपासणीअंती दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल. महाविद्यालय व विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून मंदिर प्रशासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी नमूद केले. मागील ३ वर्षांचा लेखापरीक्षकांनी आढावा घेतला. त्यानुसार समोर आलेल्या अनियमितता व आर्थिक घोळ गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचेही डॉ. नारनवरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांविरोधात मनसेचे आंदोलन
तुळजाभवानी मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या एकाधिकारशाहीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शैक्षणिक संस्थेची बदनामी होऊन संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आली. मनमानी कारभार करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची त्वरित बदली करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. काही निष्क्रिय कर्मचाऱ्यांमुळे महाविद्यालयाची प्रतिमा मलीन होत आहे. मंदिर संस्थानकडून महाविद्यालयास आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी एका चांगल्या शैक्षणिक संस्थेचे नुकसान होत आहे. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी मनविसेच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा