कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास पाच टक्के व्याज देतो असे सांगून सुमारे ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण शुक्रवारी येथे उघडकीस आले. याप्रकरणी आरोपी प्रदीपकुमार पतंगे यास पोलिसांनी अटक केली आहे.     
प्रदीप पतंगे (रा. कुंभारगाव, ता. पाटण, जि. सातारा) हा येथील राजाराम रोडवर श्री अष्टविनायक एनर्जी व मेटल्स कमोडिटी मार्केटिंग या नावाचे कार्यालय चालवत होता. त्याला व्यवस्थापक रवींद्र शेवाळे व तांत्रिक सहायक म्हणून ओंकार कुलकर्णी हे मदत करीत होते. शहर व अन्य ठिकाणच्या लोकांना या सर्वानी कमोडिटी मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करा, पाच टक्के व्याज देतो असे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी कुणाल पांडुरंग कुरळे (रा. टाकाळा) यांना व त्यांच्या सहकाऱ्यांनी ११ लाख ३० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरुवातीचे काही महिने पाच टक्के व्याज मिळत होते, पण नंतर मात्र व्याज व मुद्दल न देता पतंगे याने गुंतवणूक केलेल्या पैशाचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. कुरळे यांनी पतंगे व सहकाऱ्यांवर फसवणूक व खोटी कागदपत्रे दिल्याचा गुन्हा राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केला होता.     
पोलिसांनी शेवाळे व कुलकर्णी यांना याप्रकरणी अटक केली असता सुमारे ७० लाख रुपयांचा अपहार केल्याचे दिसून आले. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पतंगे याचा शोध घेण्याचे आदेश दिले. पतंगे हा गुजरात, पश्चिम बंगाल येथे अथवा विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक वैशाली जाधव व सहायक पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांना आधुनिक तपास यंत्रणेचा वापर केला असता समजले. पतंगे याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी त्याची प्रेयसी व चित्रपटक्षेत्रातील एका सहअभिनेत्रीला गोरेगाव येथे गाठले. अहमदाबाद येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पतंगेला सहअभिनेत्रीने अखेरच्या भेटीसाठीचे आमिष दाखवून दहिसर रेल्वेस्थानकाजवळ बोलावले. तेथे पतंगे आला. सापळा रचलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पारपत्र, लॅपटॉप, टॅब व रोख ५५ हजार रुपये जप्त केले. पतंगे याने गुन्हय़ाची कबुली दिली आहे. त्याने आपल्या या बेकायदेशीर व्यवसायाला रूपेश जयवंत माळी (रा. कुंडल, जि. सांगली) याने मदत केल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले आहे. पतंगे याने त्याचा सबब्रोकर अमोल शिरगुप्पी याच्यासमवेत शाहूपुरी दुसरी गल्ली येथे दुसरी शाखा काढली असून, तेथे ५८ लाख रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले असून स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा