पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून टाकळी ढोकेश्वरसह तालुक्यातील अनेकांना कोटय़वधींचा गंडा घालणारा भोंदूबाबा तसेच भोंदूबाबाची ओळख करून देणाऱ्या मध्यस्थांवर अंधश्रद्घा निर्मूलन समिती गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती अंनिसचे कार्यकर्ते कैलास लोंढे यांनी दिली.
गेल्या आठवडय़ात टाकळी ढोकेश्वर येथील एका प्रथितयश डॉक्टरच्या फार्म हाऊसवर पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा भोंदूबाबाने केला होता. हा पाऊस पाडण्यासाठी एक हजार रुपयांच्याच नोटा हव्यात, त्याही सर्व खऱ्याच असाव्यात, एकही नोट खोटी असेल तर पाऊस पडू शकणार नाही, अशी अट या भोंदूबाबाने घातली होती, अशी माहिती हाती आली आहे.
एक हजाराच्या नोटा संकलित करण्यासाठी टाकळी ढोकेश्वर येथील युवा कार्यकर्त्यांने टाकळी ढोकेश्वर, कान्हूरपठार, नगर, पारनेर तसेच निघोजसह विविध गावांमधून एक हजार रुपयांच्या नोटा संकलित केल्या होत्या. जमिनीचा मोठा व्यवहार करायचा आहे, त्यासाठी टोकन म्हणून हे पैसे हवे आहेत, जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर या व्यवहारात तब्बल दहा कोटींचा नफा होणार असल्याचेही सांगण्यात आले होते. नेहमी पैशात खेळणाऱ्या या युवा कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून अनेकांनी त्यास पैसे दिले. त्याच्या जवळच्या लोकांना या पावसातून दुप्पट पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर युवा कार्यकर्त्यांच्या काही मित्रांसह त्याच्या भावानेही त्यात मोठय़ा रकमा गुंतविल्याची माहिती पुढे आली आहे.
नगर येथील एका सहकारी बँकेतून एक कोटी तसेच तालुक्यातील विविध बँका तसेच पतसंस्थेतून विविध मूल्यांच्या नोटा देण्यात येऊन एक हजार रुपयांच्या घेण्यात आल्या. नोटा मोजण्यासाठी तसेच नोट खरी की खोटी हे तपासण्यासाठी टाकळी ढोकेश्वर येथील एका पतसंस्थेतील मशिनरीही फार्म हाऊसवर नेण्यात आली होती. सर्व नोटा तपासून मोजल्यानंतर त्या भोंदूबाबाच्या ताब्यात देण्यात आल्या. त्यानंतर रात्रभर पूजापाठ करण्याचे नाटक भोंदूबाबाने केले. या वेळी युवा कार्यकर्त्यांसह टाकळी ढोकेश्वरमधील कार्यकर्त्यांच्या जवळचे दोघे तरुण तसेच पुणे जिल्हय़ातील दोघे असे चौघे व भोंदूबाबा उपस्थित होते. पहाटेच्या वेळी आता अंतिम विधी केल्यानंतर पैशाचा पाऊस पडणार असल्याचे सांगत भोंदूबाबाने चौघांनाही तीर्थ म्हणून एक रसायन पिण्यास दिले. हे तीर्थ पिल्यानंतर चौघेही काही वेळात बेशुद्घ पडले, त्याचा फायदा घेत युवा कार्यकर्त्यांने संकलित केलेले घबाड घेऊन भोंदूबाबा तेथून पसार झाला. मोठी रक्कम जमा होणार असल्याने ती घेऊन जाण्यासाठी युवा कार्यकर्त्यांने टाकळी ढोकेश्वरमध्ये मोकळय़ा पोत्यांचीही व्यवस्था करून ठेवली होती. मात्र भोंदूबाबाने त्यास मामा बनविल्याने युवा कार्यकर्त्यांला तेथून हात हलवत परतावे लागले.
दुप्पट पैसे मिळविण्याच्या आमिषाने पैसे गुंतविलेले युवा कार्यकर्त्यांचे मित्र पूजेच्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी रक्कम घेऊन जाण्यासाठी फोन करीत होते. परंतु युवा कार्यकर्त्यांच्या फोनवर संपर्क होत नसल्याने या मित्रांनी कार्यकर्त्यांच्या गाडीच्या चालकास फोन करून फार्म हाऊसवर जाण्यास सांगितले. चालक तेथे पोहोचल्यानंतर चौघेही बेशुद्घ अवस्थेत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने युवा कार्यकर्त्यांच्या नातलगांना त्याची माहिती दिल्यानंतर औषधोपचार करण्यात आले. चौघेही शुद्घीवर आले. त्यानंतर मध्यस्थ असलेल्या पुणे जिल्हय़ातील दोघांना युवा कार्यकर्त्यांच्या नातलग तसेच मित्रांनी चांगलाच चोप दिला, मात्र भोंदूबाबाने त्यांनाही चुना लावल्याने त्यांच्यावर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली.
दरम्यान, कोटय़वधींची फसवणूक होऊनही प्रतिष्ठेपायी भोंदूबाबा तसेच मध्यस्थांविरुद्घ फिर्याद देण्यासाठी कोणीही पुढे येण्यास तयार नसून जनतेची अशी फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी अंधश्रद्घा निर्मूलन समिती पुढाकार घेणार असल्याचे अंनिसचे कैलास लोंढे यांनी सांगितले. १९५४चा ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमिडीज अॅक्ट तसेच २०१३च्या जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये हे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रथम फसवणूक झालेल्या लोकांची चौकशी करावी, त्यातून त्यांच्या मध्यस्थांची नावे पुढे येतील. मध्यस्थांमार्फत भोंदूबाबापर्यंत पोहोचता येईल असेही लोंढे म्हणाले.
पैशाच्या पावसाचे आमिष दाखवून कोटय़वधींचा गंडा
पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून टाकळी ढोकेश्वरसह तालुक्यातील अनेकांना कोटय़वधींचा गंडा घालणारा भोंदूबाबा तसेच भोंदूबाबाची ओळख करून देणाऱ्या मध्यस्थांवर अंधश्रद्घा निर्मूलन समिती गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती अंनिसचे कार्यकर्ते कैलास लोंढे यांनी दिली.
First published on: 17-05-2015 at 04:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of crore by imposter