वाढीव व्याजदराचे आमिष दाखवून मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम हडप करुन पतसंस्थेला टाळे लावून फरार झाल्याचे समोर येताच बीड शहर पोलिस ठाण्यात संचालक मंडळासह लिपिकाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठेवीदार विद्याधर विश्वनाथ वैद्य (वय ५२ रा.औरंगाबाद) यांनी बीड शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वैयक्तिक त्यांची १२ लाख ९२ हजार ६४० रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापक योगेश विलास स्वामी यांच्यासह संचालक मंडळ, पतसंस्थेतील लिपीक जयश्री दत्तात्रय मस्के यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा – जालना : कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

बीड शहरातील मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष, संचालक मंडळाने ठेवीदारांना १४.५० टक्के व्याजदराचे आमिष दाखवून ठेवी ठेवण्यास भाग पाडले. गेल्या दोन महिन्यांपासून सिध्दीविनायक संकुलातील पतसंस्थेच्या कार्यालयाला टाळे ठोकून संचालक मंडळासह कर्मचारी फरार झाले आहेत. ठेवीदार दररोज हेलपाटे घालत असले तरी कुलूप पाहून ते आल्या पावली परत जात होते. ठेवीदारांनी एकत्र येऊन प्रशासनाला निवेदन दिले. मात्र पोलिस प्रशासन आणि सहकार विभागातील पत्र व्यवहारात बराच कालावधी गेल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी पतसंस्थेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय प्रशासक समिती नियुक्त करण्यात आली होती. २५ ऑगस्ट रोजी समितीतील लेखापरीक्षक गणेश क्षीरसागर व अन्य दोन सदस्यांनी पतसंस्थेच्या कार्यालयात येऊन पदभार घेतला होता. तेथील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. केवळ एकाच नव्हे तर हजारो ठेवीदारांची फसवणूक झाली असून आतापर्यंत प्राप्त अर्जानुसार दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम पतसंस्थेने हडपल्याचे सुत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of depositors by matoshree credit union amy