करक-पांगरी विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवासह नऊ जणांवर गुन्हा
राज्य शासनाच्या शेती कर्जमाफी योजनेत बोगस कागदपत्रे सादर करून १० लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी राजापूर तालुक्यातील करक-पांगरी विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या संपूर्ण संचालक मंडळासह नऊ जणांविरोधात राजापूर पोलीस स्थानकात भा.द.वी. कलम ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लेखा परिक्षक बाबासाहेब किसनराव गिते, रा. चिपळूण यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या घोटाळ्याची तक्रार करक गावचे सध्या रत्नागिरी येथे स्थायिक असलेले नंदकुमार शेट्ये यांनी केली होती. २०१७ ते २०२० या कालावधीतील शासकीय ऑडिटचे रितसर शुल्क भरून करून घेतले. त्यानुसार लेखापरिक्षणात गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे. सरकारी लेखापरीक्षक, चिपळूण येथील बाबासाहेब गीते यांनी केलेल्या लेखापरीक्षणानुसार अनियमितता आढळल्यानंतर गीते यांनी राजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. याबाबत अधिक तपास राजापुर पोलीस करीत आहेत.