लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा : हवेतून पैशांचा पाऊस पाडून त्याचे ३६ कोटी रुपये करून देतो, अशी बतावणी करून दोन भोंदूबाबांनी पाच जणांना ३६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होताच पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिरासदार यांनी दिली.
कांता वामन बनसोडे (रा. देवापूर, ता. माण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या दोघांनी दैवी शक्ती व जादूटोण्याद्वारे पैशांचा पाऊस पाडून २० पट रक्कम करून देतो, असे सांगत त्यांच्यासह पाच जणांना ३६ लाख रुपयांचा गंडा घातला. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिरासदार करत आहेत.