गंतवणुकीत वर्षभरात रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून श्रीगोंदे येथील भामटय़ाने कर्जत तालुक्यात मोठा गंडा घातल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. कर्जत तालुक्यातून त्याने कोटय़वधी रुपये या पद्धतीने लांबवल्याचा अंदाज व्यक्त होत असून, हा भामटा आता गायब झाल्याने या गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे, मात्र पोलिसात तक्रार देण्यास अजूनही कोणी पुढे आलेले नाही.
श्रीगोंदे येथील एका भामटय़ाने कर्जत येथील काही चांगल्या व्यक्तींना हाताशी धरून आपली एक कंपनी आहे. या मार्फत जमिनीचे व्यवहार करणारे, बिल्डर किंवा अडचणीत आलेल्या कंपन्यांना वित्तपुरवठा करतो. त्यांच्याकडून दुपटीपेक्षा अधिक पैसे वसूल करतो, त्यात पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून या भामटय़ाने कर्जत शहरातून अनेकांना गळाला लावले. त्याच्या या आमिषाला भुलून अनेकांनी मोठय़ा प्रमाणावर रकमा त्याच्याकडे गुंतवल्या. त्याने वर्षभरात दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवले होते. कर्जत तालुक्यातून तब्बल ४ ते ५ कोटी रुपये यात गुंतवले असावेत असा प्राथमिक अंदाज असून आता भामटाच गायब झाला आहे. सुरुवातीला काहींना त्याने दुप्पट पैसेही दिले.
कर्णोपकर्णी पोहोचलेल्या या माहितीमुळे आकृष्ट होऊन तालुक्यातील अनेकांनी या भामटय़ाकडे मोठय़ा रकमा गुंतवल्या आहेत. कोणी ५० लाख, ३० लाख, १० लाख अशी गुंतवणूक केली असून आता मात्र हा भामटा गायब झाल्याने ही गोष्ट चव्हाटय़ावर आली आहे. शोध घेऊनही त्याचा तपास लागत नाही, त्याच्याशी संपर्कही होत नसल्याने ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे, मात्र पोलिसात तक्रार देण्यास अद्यापि कोणी धजावले नाही. पण तालुक्यात हा आता चर्चेचा विषय बनला आहे.