लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : परप्रांतीय कारागिरांनी साडेतीन कोटींचे ५ किलो सोने घेऊन फसवणूक केल्याची तक्रार सांगलीतील दोन सराफांनी दाखल केली आहे. यातील संशयित सध्या आटपाडी पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच त्यांना तपासासाठी ताब्यात घेणार असल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सोमवारी सांगितले.

पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, सांगलीतील सोमेश्वर ज्वेलर्स व सोमेश्वर गोल्ड या सराफी दुकानातून गौतम गोपाल दास, सौरभ गोविंद दास, रूमा गौतम दास आणि सुभा उर्फ सुभो गोविंद दास या चार कारागिरांनी सोने गाळणे, पॉलिश करून देणे, नवीन दागिने करणे यासाठी जुने सोन्याचे दागिने व सोन्याची लगड ताब्यात घेतली होती. ३१ जुलै ते ३० ऑगस्ट या दरम्यान हे सोने या कारागिरांनी सराफाकडून घेतले होते.

आणखी वाचा-Raj Thackeray : डॉ. अजित रानडेंना ‘अशा’ पद्धतीने हटवणे अत्यंत चुकीचे: राज ठाकरेंची परखड भूमिका

तत्पूर्वी दहा वर्षे हे कारागीर काम करत असून विश्वास निर्माण झाल्याने सराफ महेश्वर कांतेश्वर जवळे यांनी ५ किलो ६४ ग्रॅम ९४० मिली ग्रॅम सोने जुने दागिने, लगड स्वरूपात दिले होते. या सोन्याचे बाजारातील मूल्य ३ कोटी ६९ लाख ९७ हजार ६९६ रुपये आहे. कारागिरांनी सोने अथवा नवीन दागिने तयार करून दिले नाहीत म्हणून फसवणूक केल्याची तक्रार सराफाने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली असून चौघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यापैकी दोन भावांविरुध्द आटपाडी पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. सध्या संशयित आटपाडी पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच त्यांचा ताबा घेण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक मोरे यांनी सांगितले.