ग्राहकाच्या एटीएम कार्डचा क्रमांक विचारून त्यांच्या खात्यातून पैसे काढून लुटण्याचा प्रकार अकोल्यात पुन्हा घडला असून एका शिक्षिकेला यामुळे १३ हजार रुपयांचा फटका बसला आहे.
आपला एटीएम कार्ड क्रमांक कोणालाही सांगू नका, अशा सूचना केलेल्या असतांनाही बँक खातेदारांना चोरटे लुटत आहेत. विशेष म्हणजे, अकोल्यात सायबर पोलीस शाख कार्यान्वित झाली आहे, पण काम काहीच दिसत नाही. लोकांनी असे गुन्हे कोठे नोंदवावेत, असा प्रश्न पडला आहे. शिवाय, एटीएममधून पैसे काढले गेल्यावर ग्राहकही जास्त हालचाली करीत नसल्याचे दिसत आहे. येथील शिक्षिका भारती वासुदेव करांडे या रणपिसेनगरमधील शिव अपार्टमेंटमध्ये राहतात. आपण स्टेट बँकेचे व्यवस्थापक आहोत, असे सांगून त्या भामटय़ाने भारती यांना तुमचे एटीएम कार्ड तपासायचे आहे. तुमचा एटीएम पासवर्ड बदलला आहे, अशी बतावणी केली व भारती यांच्या एटीएम कार्डची सखोल माहिती घेतांना त्यांचा पासवर्ड माहिती करून घेतला. त्यानंतर त्यांच्या खात्यातील १३ हजार १०० रुपये काढून घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
भारती करांडे या येथील जी.एस.कॉन्व्हेंटमध्ये नोकरी करतात. त्यांना २३ जुलला रात्री मुंबईतील कुर्ला येथून स्टेट बँकेचे व्यवस्थापक रोहित मल्होत्रा नाव सांगणाऱ्या व्यक्तीचा भ्रमणध्वनी आला. त्याने भारती करांडे यांना तुमचा एटीएम पासवर्ड बदलल्याचे सांगितले. इतकेच करून तो भामटा थांबला नाही, तर बँकेकडून तुम्हाला जो संदेश येईल तो मला सांगा, असेही त्याने बजावले.
भारती यांना तथाकथित बँकेकडून तो संदेश आला. तो त्यांनी रोहित मल्होत्रा यांना लगेच सांगितला. त्यानंतर काही वेळातच एक क्रमांक त्याने या महिलेस सांगितला. हा प्रकार घडल्यावर काही क्षणातच भारती करांडे यांना दोन ते तीन संदेश आले. ते पाहून करांडे यांना धक्का बसला. कारण, त्यांच्या खात्यातील १३ हजार रुपये लंपास झाले होते. यातून त्या भामटय़ाने खरेदी केल्याचे संदेशात म्हटले आहे.
दुसऱ्या दिवशी करांडे यांनी स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेत विचारणा केली असता, आपल्या खात्यातील रक्कम परस्पर काढली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. या प्रकरणी त्यांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
एटीएम कार्डद्वारे शिक्षिकेची १३ हजार रुपयांना फसवणूक
ग्राहकाच्या एटीएम कार्डचा क्रमांक विचारून त्यांच्या खात्यातून पैसे काढून लुटण्याचा प्रकार अकोल्यात पुन्हा घडला असून एका शिक्षिकेला यामुळे १३ हजार रुपयांचा फटका बसला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-07-2014 at 07:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud through atm card