सातारा: पुणे-बंगळुरू महामार्गावर साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर खंबाटकी बोगद्याच्या पुढे कंटेनर, टँकर व तीन मोटारींचा विचित्र अपघात झाला. यामध्ये तीन मोटारी व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खंबाटकी जुन्या टोलनाक्याजवळ कंटेनरचे पुढील दोन टायर निसटल्याने कंटेनर रस्त्यातच आडवा झाल्याने वाहतूक खोळंबली होती.
जुन्या टोलनाक्याजवळ एका कंटेनरची पुढील दोन्ही चाके निखळल्याने तो रस्त्यावरच आडवा झाला होता. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे वाहनांच्या बोगद्यापर्यंत मोठ्या रांगा लागल्या होत्या. हा कंटेनर रस्त्यातून बाजूला काढण्याचे काम सुरू होते.
याचवेळी खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर उतारावर कंटेनरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने एका मोटारीला धडक दिली. ही मोटार पुढील टँकरवर आदळली. त्याचवेळी कंटेनरने दुसऱ्या दोन मोटारींना जोरदार धडक दिली. यामध्ये एक एक मोटार दुसऱ्या मोटारीच्या वर जाऊन आदळली. या अपघातामुळे खंबाटकी बोगदा ते जुन्या टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. तोपर्यंत या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.