Uddhav Thackeray Manifesto : राज्यात मुलींना मोफत उच्चशिक्षणाची सोय राज्य सरकारने केलेली आहे. आता त्याहीपुढे जाऊन राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण देणार असल्याचं वचन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरेयांनी दिलं आहे. ते आज  राधानगरी – भुदरगड मतदारसंघात के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आज राज्यात सरकारी शाळांमध्ये मुलींना शिक्षण मोफत आहे. आता आम्ही मुलांनाही तेवढंच मोफत शिक्षण देणार. कारण, हे दोघेही आपले आधारस्तंभ आहेत. दोन्ही भवितव्य आहेत. मुलगा आणि मुलगा माझ्या महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहे. महाराष्ट्र सरकार मुलींना मोफत उच्च शिक्षण देत आहे, मग मुलांनी काय गुन्हा केला आहे? आम्हा मुलांनाही मोफत शिक्षण देणार”, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी आज दिलं.

सुरतमध्ये बांधणार छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण व्हायला पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला, पण तो पुतळा आठ महिन्यांतच कोसळला. ही तुमची भक्ती छत्रपती शिवरायांबद्दल? कोश्यारी राज्यपालपदी बसले होते, त्यांच्याविरोधात आपण मोर्चा काढला. भाजपाने, शिंदेंनी त्यांचा निषेध केला नाही. महाराजांचा अपमान केला तर काय झालं, माझा तर अपमान नाही ना केला, असं मोदी म्हणाले असतील. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही महाराजांचे पुतळे नाही उभारणार तर, प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचं भव्य मंदिर उभारणार. येताना तुमच्या सर्व नेत्यांना घेऊन या आणि महाराजांसमोर नाक घासा. प्रभू श्रीरामाबद्दल आम्ही जसं श्रीराम म्हणतो तसं, जय शिवराय हे आमचा जयघोष असेल. मशालगीतामधील जय शिवाजी आणि जय भवानी शब्द काढण्याचा मुजोरपणा तुम्ही केलात. पण अद्यापही तुम्ही माझ्यावर कोणतीही कारवाई केली नाही. तुम्ही माझ्यावर कारवाई करा. मग संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर कारवाई करणार. मला जमलं ना तर सुरतमध्येही शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवेन. इंग्रजांना विरोध करण्याकरता महाराजांनी जी सुरत लुटली त्याच सुरतेला तुम्ही गद्दारांना घेऊन गेलात. त्याच सुरतेमध्ये मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून दाखवेन”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> रश्मी शुक्लांना हटवल्यानंतर राज्याचं पोलीस दल ‘या’ वरीष्ठ IPS अधिकाऱ्याच्या हाती!

जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार

“जसं आपलं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा पाच वर्षांत पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते, महागाई वाढू दिली नव्हती. आज मी जाहीर करतोय, महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुढची पाच वर्षे डाळ, तेल, साखर, तांदूळ सारखे जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवून दाखवणार. सरकारही स्थिर आणि भावही स्थिर”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यात स्वतंत्र महिला पोलीस ठाणे उभारणार

“राज्यातील महिला पोलिासांची पदे रिक्त आहेत. मग आमच्या बहिणींवर होणाऱ्या अन्यायाची तक्रार कोण घेणार? पोलीस ठाण्यात गेल्यावर कोणी तक्रार घ्यायची? महिला पोलिसांची पदे रिक्त असतील तर महिला सुरक्षा करणार कोण? महिलांसाठी शिपाईपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्व पदे भरणार. तसंच, स्वतंत्र महिला पोलीस ठाणे उभारणार”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free education to boys maharaj temple in surat and stable price for goods by uddhav thackeray sgk