जीवनातील उमेदीचा काळ व पुढे बहुतांश आयुष्य गांधीवादी उपक्रमांसाठी वेचणाऱ्या प्रा. बंग यांच्या निधनाने स्वातंत्र्यलढय़ातील अग्रणी दीप निमाल्याची प्रतिक्रिया गांधीवादी वर्तुळातून व्यक्त होत आहे.
११ जानेवारी १९१७ रोजी अमरावती जिल्ह्य़ातील गणोरी या गावी किसनलालजी व सोनाबाई यांच्यापोटी ठाकूरदासचा जन्म झाला. घरच्या दारिद्रय़ामुळे प्राथमिक शिक्षण आजोळी व पुढे दूरच्या एका नातलगाकडे राहून झाले. रॉकेलची चणचण म्हणून देवापुढील दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करीत ते सातव्या वर्गात पहिले आले
होते.
शाळेत पहिला क्रमांक कधीही न चुकविणाऱ्या बंग यांनी एम.ए.एल.एल.बी.पर्यंतचे शिक्षण शिष्यवृत्तीच्या आधारे घेतले. अमरावतीला असताना त्यांची वैचारिक जडणघडण होत गेली. नवाकाळचे वाचन व वीर वामनराव जोशींची भाषणे ऐकून त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रखर झाली. खादीचा स्वीकार केला. १९४०ला ते वध्र्यात आले. जमनालाल बजाज यांच्याशी चर्चा केली. प्रथम हायस्कूलमध्ये व नंतर येथील गो. से. वाणिज्य महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. त्या वेळचे प्राचार्य व ज्येष्ठ गांधीवादी श्रीमन्नारायण अग्रवाल यांच्याकडे राजीनामा सादर करीत त्यांनी चले जाव आंदोलनात उडी घेतली.
ब्रिटिश सरकारला १९४२ च्या ‘चले जाव’ लढय़ात सळो की पळो करून सोडणारे आंदोलन त्यांनी चालविले. काही काळ ते भूमिगत राहिले. पोलिसांच्या हाती लागल्यावर त्यांनी, आम्ही स्वतंत्र आहोत, अशी भूमिका घेत विरोध केल्यावर पोलिसांनी त्यांना दगडावर आपटले. खतरनाक कैदी म्हणून त्यांची वर्धेच्या कारागृहातून नागपूरच्या कारागृहात रवानगी झाली. तेथे त्यांनी कारागृहाचे कठडे तोडून विरोध व्यक्त केला. एकांत कोठडी मिळाली. दोन वर्षे सक्तमजुरी सुनावण्यात आली. कारागृहाचा ‘बी’ दर्जा नाकारून त्यांनी सामान्य कैद्यांसाठी असलेला ‘सी’ दर्जा स्वीकारल्याने ते सामान्य स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रेमास पात्र ठरले होते.
प्रा. बंग यांचे उभे आयुष्य महापुरुषांच्या प्रेरणेने व सहवासात व्यतीत झाले होते. महात्माची, जमनालालजी, विनोबा भावे, डॉ. कुमारप्पा, जयप्रकाश नारायण हे त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावरील दीपस्तंभ होत.
उत्तरार्धातही त्यांची व्यस्त दिनचर्या होती. त्यांनी आपल्या आलोडीच्या शेतात कृषीविषयक नवनवे प्रयोग केले. त्यांच्या ज्ञानाचा व विचारसरणीचा लाभ घेता यावा, म्हणून दिल्लीसह देशातील वेगवेगळ्या भागातून त्यांना विविध जबाबदाऱ्यांची निमंत्रणे आली. पण गांधीभूमी सोडून कुठेही जायला त्यांनी नकार दिला.
स्वातंत्र्यापूर्वी शिक्षणासाठी अमेरिकेत जायची संधी मिळाल्यावर ते गांधीजींचा आशीर्वाद घेण्यासाठी आश्रमात गेले असताना त्यांना गांधीजींनी तुझी इथेच गरज आहे, असे सांगितल्यावर बंग यांनी शिक्षणाचा विचार सोडला. तेव्हापासून ते गांधीभूमीत राहूनच कार्यमग्न राहले. गांधीवसा त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सोडला नाही. नागभूषण पुरस्काराने त्यांना वर्षभरापूर्वी गौरविण्यात आले होते. त्यांचा सन्मान म्हणून हा सोहळा सेवाग्राम आश्रम परिसरात घेण्यात आला. याप्रसंगी त्यांनी दोन शब्द व्यक्त केले होते. हाच त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम ठरला.
जमनालाल बजाज फोउंडेशनच्या पुरस्काराची दोन लाख रुपयांची तसेच अन्य असंख्य पुरस्काराची रक्कम त्यांनी हातोहात सेवाभावी संस्थांना देऊन टाकली. प्रखर बुद्धिमत्ता, अलोट देशप्रेम, अत्याचाराविरुद्ध विलक्षण चीड, बंधुत्वभाव हे त्यांचे स्थायीभाव राहिले. त्यांच्या निधनाने गांधी वर्तुळातील शेवटपर्यंत प्रकाशमान तारा निखळला, अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे.
इंदिरा गांधी सरकारने घोषित केलेल्या आणीबाणीच्या विरोधात बंग यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती, त्यामुळे बंग व त्यांच्या पत्नी सुमनताई या दोघांना १९ महिन्यांचा कारावास भोगावा लागला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा