लोकसत्ता वार्ताहर
हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील पूरजळ शिवारात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अवैध गौण खनिज विरोधी पथकातील महिला तलाठी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिसात नालेगाव येथील उपसरपंचासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अवैध गुणवाळू उपसासंदर्भात शासनाचे नव्याने धोरण अभ्यास निश्चित झाले नाही. परिणामी पूर्व वाळू घाटाचे लिलाव रखडले, तसेच शासनाने वाळू वितरणाचे सुरू केलेले डेपो बंद पडले आहेत. परंतु जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैधगौण खनिज,अवैध वाळू उपसा व त्याची वाहतूक सुरू आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी महसूल प्रशासनाने अवैध गौण खनिज पथकांची स्थापना केली. मात्र वाळूमाफिया अशा पथकांना जुमानण्यास तयार नाहीत. एक महिन्यापूर्वी कळमनुरी येथे वाळू माफियांनी पथकावर हल्ला केला होता. सदर प्रकरणी कळमनुरी पोलिसात आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाची चर्चा थांबते ना थांबते तोच आताऔंढा नागनाथ तालुक्यातील पूरजळ ‘शिवारात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करायला गेलेल्या पथकातील तलाठी सुवर्णमाला शिरसाठ व महसूल कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तलाठी सुवर्णमाला शिरसाट यांच्या तक्रारीवरून नालेगाव येथील उपसरपंचासह अन्य दोघांवर औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पूरजळ शिवारातवाळूची विनापरवाना चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती येथील अवैध गौण खनिजविरोधी पथकाला मिळाली. त्यावरून तलाठी सुवर्णमाला शिरसाठ पंथकासह कारवाईसाठी गेल्या होत्या. दरम्यान पूरजळ ते जवळा बाजार रोडवर ट्रॅक्टरद्वारे वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कारवाई करीत वाहन जप्त करण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने तलाठी सुवर्णमाला शिरसाठ यांना शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
याशिवाय ट्रॅक्टर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना नागेशवाडीजवळ नालेगाव ‘येथील उपसरपंच प्रल्हाद उत्तमराव आहेर व असोला येथील गणेश घुगे यांनी ट्रॅक्टर अडवून महिला तलाठी व साक्षीदार यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, याप्रकरणी तलाठी सुवर्णमाला शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात तिघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.