सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्य़ात परप्रांतातील लोकांनी जमीन खरेदीला प्राधान्य दिले आहे. सी वल्र्ड प्रकल्पाच्या चर्चेमुळे वायंगणी भागात जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले असून दिल्लीच्या एकाला एजंटाने गंडविले असल्याची मालवण पोलीस स्थानकात केस दाखल झाली आहे. सुमारे १ कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दिल्लीच्या विक्रमादित्य योगेश चंद्रा यांची जमीन खरेदी व्यवहारात १ कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दिल्ली येथील संजय दत्त, मुंबई मालाड येथील द्वारकाधीश प्रभुदयाळ पुरोहित व अन्य दोघांविरोधात मालवण पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मालवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मालवण तालुक्यातील वायंगणी-तोंडवळी गावात शासनाच्या वतीने पर्यटन उद्योग वाढीस लागण्याच्या दृष्टीने सुमारे सातशे कोटी रुपयांचा सी वर्ल्ड प्रकल्प चर्चेत आहे. त्यामुळे हा भाग प्रकाशझोतात आहे.
या पाश्र्वभूमीवर मे २००६ ते मार्च २०११ या कालावधीत दिल्लीच्या संजय दत्त आणि विक्रमादित्य योगेश चंद्रा या दोघा भागीदारांनी वायंगणी गावात जमीन खरेदी करण्याचे ठरविले. त्यानुसार जमीन खरेदी व्यवहार पाहण्याची जबाबदारी मुंबई मालाड येथील द्वारकाधीश प्रभुदयाळ पुरोहित या एजंटावर सोपविण्यात आली. त्यानुसार संजय दत्त व पुरोहित यांच्याजवळ रक्कम त्यांनी दिली.
जमीन खरेदीविषयी पुरोहित यांना विचारल्यावर त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर पोलीस स्थानकात विक्रमादित्य चंद्रा यांनी तक्रार दिली. या तक्रारीत वायंगणी येथील जमीन द्वारकाधीश पुरोहित याने खरेदी केली आहे. या जमिनीच्या कागदपत्रावर त्याने स्वत:चे नाव तसेच पत्नी पूजा आणि संजय दत्त यांची नातेवाईक असलेली अपर्णा दुबे यांच्या नावे असल्याचे आढळून आले आहे. याबाबत मालवण पोलिसांनी द्वारकाधीश पुरोहित, संजय दत्त, अपर्णा दुबे व पूजा पुरोहित या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मालवण पोलीस निरीक्षक संजय साबळे अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader