बेडूक व लांडगा या दोन प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आल्याची माहिती वन विभागाच्या नव्या पाहणीत आढळून आली आहे. राज्यात बेडकांच्या ६ कुळांतील (फॅमिली) सुमारे ४५ जाती होत्या. यातील काही जातींचे अधिवास प्रदूषणामुळे, तर काही अधिवास जंगलाला आग लागल्याने कमी होत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.
बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वन विभागाने ही पाहणी केली. यात औरंगाबादजवळील २२ हेक्टर क्षेत्रावरील जंगलात वन्य प्राण्यांची संख्या दुपटीने झाली आहे. विशेषत बिबटय़ांच्या संख्येतही वाढ झाली आहे. पाहणीदरम्यान ठसे आढळून आले, तर काही बछडेही दिसले. पक्ष्यांची संख्याही कमालीची वाढली आहे. मात्र, सध्या वन विभागातील अधिकाऱ्यांना बेडकांची संख्या कमालीची चिंतेत टाकणारी वाटत आहे. काही भागात बेडकाचा पाय खाद्य म्हणून वापरला जात असल्याने परदेशी बेडूक विकले जात. अलीकडे मात्र जंगलाला आग लागण्याच्या घटनांमुळे, तसेच प्रदूषण व अन्य कारणांनी बेडूकउडी भविष्यात पाहायला तरी मिळेल का, असा प्रश्न अभ्यासकांना पडला आहे.
जालना येथे औषधविक्री व्यावसायात कार्यरत रमण उपाध्ये बेडूक अधिवास व त्यांची घटती संख्या यावर अभ्यास करतात. ते म्हणाले, वन विभागाने गोळा केलेली आकडेवारी तशी फारच ढोबळ आहे. पण बेडकांची संख्या घटली आहे. त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण व्हावा, एवढे हे गंभीर आहे. राना टायग्रिना (नवे शास्त्रीय नाव होपलोबॅरेचुअस) या पेशीतील बेडूक नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काही प्रजाती तर नष्टही झाल्या आहेत. याचा पर्यावरणास मोठा धोका असल्याचेही अभ्यासक मानतात. वन विभागाच्या पाहणीतही ही बाब समोर आली आहे. मराठवाडय़ात बेडकांच्या २० ते २१ प्रकारच्या प्रजाती आहेत. अधिवास नष्ट होत असल्याने जाती संपुष्टात असल्याच्या त्याच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
केवळ बेडूकच नाही, तर लांडगा ही प्रजातही हळूहळू कमी होत आहे. लांडगे किती संख्येने कमी झाले, याची माहिती देण्यास वन विभागातील अधिकाऱ्यांनी नकार दिला. मात्र, ही त्यांची संख्या कमी होत असल्याचे ते मान्य करतात. हे जीव वाचवायचे असतील तर जंगलाला आग लागण्याच्या प्रमाणात घट होणे आवश्यक असल्याचे वन विभागातील अधिकारी सांगतात.
– औरंगाबाद जिल्ह्यात २२ हजार हेक्टर क्षेत्रावर जंगल आहे. कन्नड, चाळीसगाव व नागद या क्षेत्रात बुद्धपौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या पाहणीत ७७ प्रकारच्या वन्यजीव प्रजाती आढळून आल्या. गेल्या पाहणीत ३ हजार वन्यजीव दिसले होते. या वेळच्या पाहणीत ही संख्या ७ हजारांवर गेली आहे.
– वनक्षेत्रात प्राण्याचा अधिवास कळावा व त्यांच्यावर लक्ष ठेवता यावे, या साठी १२ कॅमेऱ्यांची आवश्यकता होती. आठ कॅमेरे उपलब्ध झाले असून ते बसविण्याचे काम सुरू झाले आहे.
‘बेडूकउडी’ धोक्यात!
बेडूक व लांडगा या दोन प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आल्याची माहिती वन विभागाच्या नव्या पाहणीत आढळून आली आहे. राज्यात बेडकांच्या ६ कुळांतील (फॅमिली) सुमारे ४५ जाती होत्या.
First published on: 29-05-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Frog in danger