सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते गोिवदराव पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना सत्वर अटक करावी, या मागणीसाठी मंगळवारी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. आंदोलकांनी मोदी शासन व आरएसएस परिवाराला टीकेचे लक्ष्य केले होते. आरोपींना चार दिवसांत न पकडल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी दिला.
भाकपचे ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे व उमा पानसरे या उभयतांवर सोमवारी गोळीबार करण्यात आला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर येथील खासगी इस्पितळात शस्त्रक्रिया करण्यात आली. पानसरे यांच्यावर हल्ला झाल्यामुळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या गुन्ह्यात अडकलेल्या आरोपींवर कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोर्चाचे आयोजन केले होते.
बिंदू चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलकांनी हातामध्ये लालनिशाण, महात्मा गांधी व पानसरे यांच्या प्रतिमा घेतल्या होत्या. पळून गेले गोळी मारणारे, जिवंत राहिले पानसरे, खाकी चड्डी काळी टोपी मुर्दाबाद, लालनिशाण िझदाबाद, आपण सारे पानसरे आदी घोषणा दिल्या जात होत्या. मोर्चाच्या प्रारंभी ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, डॉ. शैला दाभोलकर आदी होते. शहराच्या मुख्य मार्गाने फिरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. तेथे मोदी शासन व संघ परिवाराच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस तपासाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. हल्लेखोरांना चार दिवसांच्या आत जेरबंद न केल्यास पुरोगामी चळवळीतील कार्यकत्रे तीव्र संघर्ष करतील असा इशारा एन. डी. पाटील यांनी या वेळी दिला.
लक्ष्मण ढोबळे यांना रोखले
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर पुरोगामी चळवळीतील प्रमुखांची भाषणे सुरू झाली. या वेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे भाषण करण्यासाठी उभे राहिले. पण पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना त्यांनी भाषण करण्यापासून रोखले. राष्ट्रवादी व भाजपचे अंतर्गत साटेलोटे असल्याचा मुद्दा उपस्थित करून ढोबळे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांना अखेपर्यंत बोलू दिले नाही.
सरकारचे अपयश- विखे पाटील
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सायंकाळी इस्पितळात जाऊन पानसरे दाम्पत्याच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पानसरे यांच्यावर हल्ला करणारे आरोपी अजूनही मोकाटच आहेत, हे शासन व प्रशासनाचे अपयश आहे. पोलीस महासंचालकांची उचलबांगडी करण्याची मागणी करून त्यांनी पोलीस तपासाबद्दल नाराजी व्यक्त केली.
चौकशी सुरू- पालकमंत्री
पानसरे यांच्यावरील हल्ल्याची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. अद्याप ठोस धागेदोरे उपलब्ध झाले नाहीत, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, तपासासाठी पुण्यातील एटीएसचे पथक शहरात दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू असली तरी निश्चित माहिती पोलिसांच्या हाती आलेली नाही.
हिंदुत्ववाद्यांकडून निषेध
ज्येष्ठ नेते गोिवदराव पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध मंगळवारी इचलकरंजी येथे विश्व िहदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने करण्यात आला. हल्लेखोरांचा तपास युद्धपातळीवर होऊन त्यांना अटक करून कठोर शासन करण्यात यावे, अशी मागणी वििहपचे जिल्हाध्यक्ष बाळ महाराज, अ‍ॅड. जवाहर छाबडा यांनी केली. पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये िहदुत्ववादी शक्ती गुंतलेल्या आहेत, असा विनाआधार आरोप करून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ नये. या भूमिकेमुळेच डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणाचा शोध भरकटला होता असेही या वेळी संतोष हत्तीकर म्हणाले.
 

Story img Loader