किरकोळ कारणावरून पालिका शाळेच्या मुख्याध्यापकांना बेदम मारहाण करणे, कपडे फाडत त्यांची शहरातून धिंड काढण्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज महाबळेश्वर शहरात उस्फूर्तपणे निषेध मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, या घटनेबद्दल अकरा जणांना अटक केली असून यामागचा मुख्य सूत्रधार असलेला नगरसेवक कुमार शिंदे अद्याप फरारी आहे.
महाबळेश्वर पालिका प्राथमिक शाळा क्रमांक १ मधील मुख्याध्यापक संजय ओंबळे यांच्या कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा खराब झाली म्हणून त्यांनी ती कपाटात ठेवली होती. या कारणावरून शिंदे आणि त्यांच्या सोबत आलेल्या काही तरुणांनी ओंबळे आणि शाळा क्रमांक २ चे मुख्याध्यापक जनार्दन कदम यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावर शाई टाकत, त्यांचे कपडे फाडत त्यांची महाबळेश्वर बाजारपेठेतून धिंडही काढण्यात आली.
दरम्यान, या घटनेचे लगोलग शहरात अनेक ठिकाणी पडसाद उमटले. आज या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा शहरातून काढण्यात आला. यामध्ये सर्व पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिवसेना, सातारा जिल्हा शिक्षक संघटना, महिला शिक्षिका, विविध सेवाभावी संघटना नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. संबंधित नगरसेवकांच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून तसेच त्यांच्या निषेधाच्या घोषणा या वेळी देण्यात आल्या. तसेच गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली. या वेळी सातारा जिल्हा शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्याधिका-यांना यांना निवेदन देण्यात आले. पालिका मुख्याधिकारी सचिन पवार यांनीही या प्रकरणी आरोपींवर पाठिशी घातले जाणार नसल्याचे सांगितले.
दरम्यान, या घटनेबद्दल आतापर्यंत अकरा जणांना अटक केली असून यामागचा मुख्य सूत्रधार असलेला नगरसेवक कुमार िशदे मात्र अद्याप फरारी आहे.

Story img Loader