पंचगंगा नदीतून दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत पावल्याने निष्क्रिय ठरलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निषेध नोंदवत मंगळवारी येथील मानवाधिकार संघटनेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात मृत माशांचा तिरडी मोर्चा काढला. सडलेल्या अवस्थेतील मासे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात टाकल्याने संपूर्ण उद्योग भवनात त्याची आत्यंतिक दरुगधी पसरली. परिणामी, प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हा उद्योग केंद्र, पर्यटन मार्गदर्शन केंद्र, सहकार कार्यालय येथील कर्मचाऱ्यांना व कामासाठी आलेल्या नागरिकांना पळ काढावा लागला.
पंचगंगा नदीमध्ये शिये पुलाजवळ हजारो मृत माशांचा थर पडला असल्याचे सोमवारी आढळून आले होते. याविरोधात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी आवाज उठविल्यानंतर त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन, मत्स्य विभाग यांचे लक्ष गेले. त्यांनी दूषित पाण्याचे पंचनामे घेतले. पंचगंगा नदीत रासायनिक सांडपाणी मिसळणाऱ्या राजाराम सहकारी साखर कारखान्याला कारणे दाखवा नोटीस पाठवली. नदी प्रदूषित होण्याच्या या गंभीर प्रकाराचे पडसाद मंगळवारी पुन्हा उमटले.
मंगळवारी दुपारी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मृतावस्थेतील मासे गोळा केले. या माशांचा त्यांनी तिरडी मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयालगत असलेल्या उद्योग भवनामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय आहे. या कार्यालयावर तिरडी मोर्चा नेण्यात आला. रिकामी ताटे हलगीसारखी वाजवत कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर चेंबुगडे, उदय सावंत, प्रदीप मुदगल, मोहन थोरात, प्रशांत जाधव, रवींद्र विभुते, उदय घाटगे आदी कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत तिरडीतील मृत माशांचा थर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रवेशद्वारात टाकला. त्यांनी चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावले. कार्यालयात प्रादेशिक अधिकारी सूर्यकांत डोके, मनीष होळकर असे वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित होते. हे समजल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
कार्यकर्त्यांनी आंदोलनासाठी आणलेले मासे आत्यंतिक सडक्या अवस्थेत होते. या माशांची प्रचंड दरुगधी येत होती. दरुगधीच्या परिणामामुळे उद्योग भवनात असलेले सहकार पर्यटन आदी केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व कामासाठी आलेल्या नागरिकांना दरुगधी सहन झाली नाही. काही वेळातच संपूर्ण उद्योग भवन निर्मनुष्य झाले. तर इकडे दरुगधी येत असतानाही कार्यकत्रे घोषणा देत आंदोलन करीतच होते.
प्रशासनाचा कोडगेपणा
पंचगंगा नदीमध्ये हजारो मृत माशांचा थर पडल्याचे सोमवारी उघडकीस आले होते. इतका गंभीर प्रकार घडूनही याची कल्पना प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग, कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद यापकी कोणालाही नव्हती. या घटनेचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाकडून नदीतील मृत मासे बाहेर काढण्यासाठी तत्परतेने कारवाई होईल असे वाटत होते. मात्र सदर आस्थापनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या प्रकाराची फारशी दखल घेतली नसल्याने नदीत मृत माशांचा थर कायम होता. मृत मासे सडू लागल्याने पाणी आणखी दूषित होऊन रोगराई पसरण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना प्रशासनाचा कोडगेपणा ठळकपणे दिसून आला. या प्रकाराचा निषेध प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी नोंदवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा