महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये मिळून एकूण २० हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. यात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी यासंदर्भात एक परिपत्रक काढून पाचही जिल्हाधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

ठाणे जिल्ह्यात २ हजार ५०० हेक्टर,  पालघर जिल्ह्य़ात ४ हजार हेक्टर,  रायगड जिल्ह्यात ४ हजार ५०० हेक्टर, रत्नागिरी जिल्ह्यात ५ हजार हेक्टर, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ हजार हेक्टरवर अशा एकूण २० हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती ही फलोत्पादनासाठी उपयुक्त आहे. पण आजही कोकणातील एकूण भौगोलिक क्षेत्रातच्या ३९ टक्के म्हणजे ११ लक्ष हेक्टर जमीन पडीक आहे. तर दुसरीकडे या विभागात अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या ८४ टक्के आहे. याचा विचार करून येथील शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढावे म्हणून कोकण विभाग आयुक्तांनी ही महत्त्वाकांक्षी फळबाग लागवड मोहीम घेण्याचे ठरवले आहे. आंबा, काजू, नारळ यांसह चिकू आणि बांबू लागवड केली जाणार आहे. आंबा काजूसारख्या निर्यातक्षम फळांच्या उत्पादनामुळे परकीय चलनवाढ शक्य होणार आहे.

या उपक्रमासाठी जिल्हास्तर आणि तालुकास्तर अशा दोन समित्या कार्यरत असणार आहेत. जिल्हास्तरीय समितीत जिल्हाधिकारी अध्यक्ष असणार आहेत. तर तालुकास्तरीय समितीची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांकडे असणार आहे. या फळबाग लागवडीच्या परिपूर्ण प्रस्तावाला जास्तीतजास्त ३१ जुलपर्यंत तांत्रिक मान्यता देण्यात यावी. १ ऑगस्टपर्यंत तालुक्यातील सर्व फळबाग लागवड प्रस्ताव शासकीय मान्यतांकरिता तहसीलदारांकडे सादर करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष लागवडीला सुरुवात करण्याचे निर्देश पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्याधिकारी शीतल उगले यांनी यासंदर्भात नुकतीच एक बठक बोलावली होती. या वेळी सर्व संबंधित विभागांना या उपक्रमाच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी तयारी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

Story img Loader