सांगली : अचानक इंधन टाकीचा स्फोट होण्याचा प्रकार मंगळवारी सकाळी लेंगरे येथील गुजलेवस्ती शाळेत झाला. मध्यान्ह भोजन तयार करणार्या महिलेच्या प्रसंगावधानाने कोणालाही इजा झालेली नसली तरी स्वयंपाक करण्याची खोली मात्र उध्वस्त झाली.
गुजलेवस्ती येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. नेहमीप्रमाणे शाळेतील मुलांसाठी एका खोलीत खाद्य पदार्थ इंधनवायूवर तयार करण्यात येत होते. यावेळी खाद्य पदार्थ तयार करणारी महिला स्वप्नाली गायकवाड ही खोलीत गेली असता गॅस पेटवत असताना अचानक मोठा जाळ झाला. प्रसंगावधान राखत तिने गॅस बंद करीत खोलीबाहेर येउन वर्गात असलेल्या मुलांना बाहेर काढले. आणि काही क्षणातच मोठा गॅसचा मोठा स्फोट झाला. मुलांना बाहेर काढले असल्याने अनर्थ टळला असला तरी खोलीचे पत्रे या स्फोटाने दुरूवर जाउन पडले.
या घटनेची माहिती मिळताच सरपंच लक्ष्मीताई पाटील, ग्रामविकास अधिकारी सुभाष भोते, सुनील पाटील, राजेंद्र देशमुख आदींनी शाळेत धाव घेतली. कोणालाही इजा झालेली नसली तरी गॅस स्फोटाने हा परिसर हादरून गेला होता.