शहराजवळील पानेवाडी येथील इंडियन ऑईल कंपनीच्या डेपोतील टँकर चालक व मालकांनी शनिवारपासून सुरू केलेला संप रविवारीही कायम राहिल्याने इंधन वाहतूक ठप्प झाली आहे. या संपावर सोमवारी तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कंपनीच्या येथील डेपोमधून राज्याच्या विविध भागात टँकरव्दारे इंधन पुरवठा केला जातो. काही दिवसात टँकर भरण्याच्या प्रक्रियेत ठराविक वितरकांच्या टँकरला प्राधान्य देण्याचे प्रकार घडू लागल्याने इतर टँकर चालकांमध्ये नाराजी मिर्माण झाली. टँकर भरण्यासाठी लवकर नंबर लागत नाही. टँकर अधिक काळ रांगेत उभे राहू लागल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याची टँकर चालकांची तक्रार आहे. कंपनीच्या या मनमानी कारभारामुळे शनिवारपासून या इंधन कंपनीतील टँकर चालक व मालकांनी संप पुकारला आहे. या संपात ३०० पेक्षा अधिक टँकर सहभागी झाले आहेत. इंडियन ऑईल कंपनीच्या या डेपोतून राज्याच्या आठ जिल्ह्य़ांमध्ये इंधनाचा पुरवठा केला जातो. या जिल्ह्यातील इंधन पुरवठय़ावर या संपाचा अधिक परिणाम झाला आहे. टँकर चालक मालकांनी खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून गाऱ्हाणे मांडले. खा. चव्हाण यांनी पानेवाडीतील कंपनी प्रशासनाशी टँकर चालक व मालकांच्या मागणीवर चर्चा केली. टँकर भरण्याच्या प्रक्रियेत कोणावरही अन्याय करू नका, असे त्यांनी कंपनी प्रशासनास बजावले.    

Story img Loader