भुईंज (ता. वाई) येथील मोक्क्याच्या गुन्ह्यातील फरार गुंड बंटी जाधवसह त्याच्या चार साथीदारांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पंजाबमध्ये जाऊन ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील उपस्थित होते .
भुईंज (ता. वाई) येथील गुंड बंटी जाधव याने टोळी तयार केली होती. या टोळीतील सहकाऱ्यांच्या मदतीने भुईंज येथील आसले पुलावर राहणाऱ्या युवकाचे त्यांनी अपहरण करून त्याचा खून केला होता. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने भुईंज स्मशानभूमीत त्याच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली होती व या घटनेनंतर बंटीने तेथून पलायन केले होते. तसेच, टाळेबंदीत साथीदारांसह वाई शहरात दुसऱ्या टोळीच्या वर्चस्व वादातून लाठ्या काठ्या घेऊन दहशत माजवत प्रतिस्पर्धी टोळीवर गोळीबार देखील केला होता. त्यानंतर बंटी जाधवने पलायन केले होते. त्यामुळे फरार बंटीचा शोध घेण्याचे आव्हान वाई पोलिसांपुढे होते.
या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ दोन महिन्यांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांसह बंटीच्या मागावर होते. अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्यामुळे तो आपल्या वास्तव्याची ठिकाणे वरचेवर बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्यावर वाई आणि भुईज पोलीस ठाण्यात १५ गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, बंटी आपला साथीदार निखील शिवाजी मोरे (वाई ) साथीदारांसह राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळाली. वास्तव्याच्या ठिकाणी जाईपर्यंत त्याने आपल्या ठिकाणा बदलला होता. राजस्थान, पंजाब, हरियाणा या ठिकाणी त्याने वास्तव्य केले होते. नेपाळमध्ये जाऊन त्याचा शोध घेतला गेला. त्यानंतर पंजाबमध्ये जाऊन भटींडा येथे त्याच्यासह त्यांच्या तीन साथीदारांसह ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याबरोबर मयूर महादेव साळुंखे (कालगाव) येथील उंब्रज पोलीस ठाण्याच्या अभिलेखा वरील गुन्हेगारही मिळाल्याची माहिती बन्सल यांनी दिली. बंटी जाधव याची सध्या चौकशी सुरू आहे. त्यांच्याबरोबर आणखी एक व्यक्ती होती त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही परंतु त्याची चौकशी करण्यात येईल. अशी देखील माहिती देण्यता आली.
तसेच, सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी गुन्हे चौकशी कामी गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी हल्ला केला आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे आणि पुणे येथील गुंड गजा मारणे हा शरण आलेला नसून त्याचा पाठलाग करून त्याला मेढा पोलिसांनी पकडले आहे. अशी माहितीही यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिली. या कामगिरीबद्दल सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी किशोर धुमाळ रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे व कर्मचाऱ्यांच्या पथकाचे पोलिस अधीक्षक बन्सल व अप्पर अधीक्षक पाटील यांनी अभिनंदन करत कौतूक केले आहे.