गुजरात सरकारने रायगड जिल्ह्य़ातील सव, दासगावमधील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दिलेला निधी वापराविना पडून आहे. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांना पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी लिहिलेल्या पत्रात ही बाब समोर आली आहे. राज्य सरकार दरडग्रस्तांच्या बाबतीत किती उदासीन आहे हे यावरून स्पष्ट झाले आहे.
जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड पोलादपूरमधील अनेक गावे उद्ध्वस्त झाली. या गावांच्या पुनर्वसनासाठी सामाजिक संस्थांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. जुई, कोंढिवते, रोहण या गावांचे जनकल्याण ट्रस्ट, प्राइड इंडिया, लालबागचा राजा यांसारख्या संस्थांकडून पुनर्वसन करण्यात आले. सव आणि दासगाव परिसरातील दरडग्रस्तांसाठी गुजरात सरकारनेही १० कोटींचा निधी दिला. गेली आठ वर्षे हा निधी वापराविना पडून आहे. या परिसरातील ६८ कुटुंबासाठी हा निधी खर्च करण्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी लाभार्थ्यांचे ४० हजार आणि मुख्यमंत्री साह्य़ता निधीतून ६० हजार रुपये दिले जाणार आहेत. निधीच्या उपलब्धतेसाठी कार्यवाही सुरू असल्याचे पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी गोगावले यांना लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
 राज्य सरकार दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत किती गंभीर आहे. हे यावरून सिद्ध होत असल्याचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी म्हटले आहे. गुजरात सरकारचा निधी आजवर का वापरला नाही याचे उत्तर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader