कराड: महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड (एमएडीसी) अंतर्गत असणाऱ्या कराड विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून २२१ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता देण्यात आल्याचा शासन आदेश जारी झाल्याची माहिती कराड दक्षिणचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराडमधील कार्यालयातून निवेदनाने देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवेदनात म्हटले आहे, की विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड विमानतळ विस्तारिकरणांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, कि महाराष्ट्रातील तालुका ठिकाणचे पहिले विमानतळ कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केले. कारण कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी स्थानिकांचा विरोध नसून, त्याबाबत योग्य तो मोबदला त्यांना हवा आहे. यासाठी राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली होती.

आणखी वाचा-सांगली : पहिल्याच सौद्यात बेदाण्याला १८० रुपये प्रतिकिलो भाव

चव्हाण यांच्या या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार २० ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) कराड विमानतळाच्या विकास व विस्तार या कामांसाठी सादर केलेल्या २२१ कोटी ५१ लाख रुपयांच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

कराड विमानतळ विस्तारिकरणासाठी ज्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत त्यांना योग्य मोबदला देण्याची आवश्यकता असल्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली होती. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, कि कराड विमानतळ विस्तारीकरणाबाबत जर शेतकऱ्यांच्या काही अडचणी नसतील, तर निधीची कोणतीही कमी होणार नाही. कराडचे विमानतळ हे अत्यंत महत्त्वाचे व स्ट्रेटेजिक विमानतळ आहे. त्यामुळे जर त्याचा विस्तार करता आला तर त्याचा नक्कीच त्या भागातील लोकांना फायदा होऊ शकतो.

आणखी वाचा-सांगली : घरफोड्या करणारी टोळी गजाआड, १९ लाखाचा ऐवज हस्तगत

पश्चिम महाराष्ट्रातील विमानतळांचा विचार केल्यास कराड सारख्या ठिकाणी एक मध्यवर्ती विमानतळ असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे कराड विमानतळ विस्तारिकरणासाठी निधी मिळाला असून लवकरचl विमानतळ विकास कंपनीकडून कामास सुरुवात होणार आहे. असे पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fund of 221 crore 51 lakhs approved for expansion of karad airport mrj
Show comments