अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाचे भूमिपूजन
अलिबाग : उद्योग आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करतांना लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत आरोग्य यंत्रणा बळकटीकरणावर भर दिला आहे. रायगड जिल्ह्यात आज आधुनिक सोयीसुविधा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची उभारणी आपण करतो आहोत. या रुग्णालयासाठी तसेच वैद्यकीय महाविद्यालयासाठी जे सहकार्य लागेल ते राज्यसरकारकडून दिले जाईल, त्याचबरोबर निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ते अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर राज्य सरकारने भर दिला आहे. या काळात लसीकरणावर भर द्यायला हवा. लसीकरणानंतरही करोनाची लागण होत असली तरी त्याची घातकता कमी होते. जीव वाचविण्याचे सुरक्षा कवच म्हणून लसीकरण महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. वडखळ येथे ट्रॉमा केअर रुग्णालय उभारण्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असते असे म्हणतात, या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेचे काम होईल, असा विश्वास यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वेळी व्यक्त केला.
अलिबाग येथील उसर येथे ५२ एकर परिसरात या महाविद्यालयाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून साडेचारशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार गैरहजर
अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभाला शिवसेनेचे जिल्ह्य़ातील तीनही आमदार गैरहजर राहिले. त्यामुळे जिल्ह्यात महाआघाडीतील विसंवाद आणि नाराजी पुन्हा एकदा समोर आली. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावरील नाराजीमुळे शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.