मनोर येथील दुर्वेस येथे माणुसकीचे दर्शन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर: मनोर दुर्वेस येथील वृद्धाश्रमात निधन झालेल्या वृद्ध महिलेवर मनोरच्या मुस्लीम समाजाने हिंदूपरंपरा विधीप्रमाणे तिच्यावर अंत्यसंस्कार करून  मानवतेचे दर्शन घडवले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीच्या काळात अंत्यसंस्काराचा विधी मुंबईला जाऊन करणे अशक्य असल्याने मुस्लीम समाजाने मानवतेचा धर्म पाळून त्यांनी अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला.  सर्वधर्मसमभाव जपणाऱ्या  या नागरिकांचे परिसरात कौतुक होत आहे.

मनोर दुर्वेस येथील वृद्धाश्रमातील संध्या बिनसाळे (८९) या वृद्ध महिलेला उपचारासाठी मनोर येथील आस्था रुग्णालयामध्ये शुक्रवारी सायंकाळी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर तिचा मुलगा

प्रकाश बिनसाळे हा मुंबईहून मनोरला पोहोचला, परंतु टाळेबंदीमुळे मृतदेह मुंबईला नेणे शक्य नसल्याने मनोरलाच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या वेळी मनोरचे सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्वपरिचित असलेले रुग्णवाहिका चालक बिलाल रईस, बिलाल खतीब, फुरकान खतीब, रयान दळवी, फरहान दळवी आणि युसूफ मेमन आदींच्या मदतीने मनोर येथील हातनदीवरील स्मशानभूमीत हिंदू परंपरा विधीनुसार अंत्यसंस्कार केले. देश कठीण परिस्थितीतून जात असताना मनोरच्या मुस्लिमांनी दाखवलेल्या सामाजिक बांधीलकीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.