सासरच्या मंडळींनी विवाहितेला असह्य छळ करून खून केल्याचा आरोप करीत संतप्त माहेरच्या मंडळींनी विवाहित लेकीच्या मृतदेहावर सासरच्या घरासमोर अंगणातच अंत्यसंस्कार केले. सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथे ही घटना घडली. अंजली हणमंत सुरवसे असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचे माहेर पंढरपूर तालुक्यातील उंबर पागे येथील आहे.
पीडित विवाहिता अंजली सुरवसेचा विवाह सहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ मध्ये मिटकलवाडीच्या हणमंत सुरवसे या तरूणाबरोबर झाला होता. मात्र, आता गावातील एका विहिरीत अंजलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांवर पीडितेच्या छळाचा आणि खुनाचा आरोप केला. सासरच्या लोकांनी खुनानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह विहिरीत टाकल्याचा आरोप अंजलीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला. याप्रकरणी सासरच्या लोकांविरूध्द हुंडाबळीसह खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
मृत अंजलीचा मृतदेह पाहून माहेरच्या मंडळींचा सासरकडील लोकांवरचा राग अनावर झाला. अंजलीचा मृतदेह त्यांनी तिच्या सासरी आणला आणि तेथे घरासमोरच अंगणात चिता रचून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यावेळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा : “मुलांना नीट जेवण देत नाही, सांभाळत नाही”, पुण्यात पतीच्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू
दरम्यान, या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत असून त्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.