लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा : सातारा शहर, कोरेगाव आणि १५ ग्रामपंचायतींसाठी श्री बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून संगम माहुली येथे उभारलेल्या कैलाश स्मशानभूमीत यापुढे दररोज सकाळी सात ते रात्री दहा या वेळेतच पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. मात्र वैद्यकीय कारणासाठी तातडीने अंत्यसंस्कार गरजेचे असणाऱ्या पार्थिवांवरील अंत्यसंस्कारासाठी हा नियम लागू नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
श्री बालाजी ट्रस्ट, साताराच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. लोकसहभागातून संगम माहुली येथे उभारलेल्या कैलास स्मशानभूमीतील अंत्यसंस्काराचे कार्य मागील २२ वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. कोरोना काळातसुद्धा दहापटीने अंत्यसंस्काराचे काम वाढले असताना हे काम सुरू होते.
स्मशानभूमीसारख्या ठिकाणी कामगार मिळणे आणि ते टिकवणे फार अवघड जात आहे. नियम नसल्यामुळे नागरिक अंत्यसंस्कारासाठी पार्थिव वेळीअवेळी घेऊन येतात. रात्रीच अंत्यसंस्काराचा आग्रह धरतात. अंत्यसंस्कार करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. अशा वेळी अंत्यसंस्कार करणे अवघड बनत आहे. त्यामुळे नागरिकांना ही नियमावली खलवली आहे. यातूनही वैद्यकीय कारणासाठी तातडीने अंत्यसंस्कार गरजेचे असणाऱ्या पार्थिवांवरील अंत्यसंस्कारासाठी हा नियम लागू नसल्याचेही संस्थेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्माशनभूमीतील काम चालवणे हे अवघड कार्य आहे. यासाठी कर्मचारी मिळत नाहीत. स्वच्छताही राखावी लागते. हे सर्व काम करण्यासाठी कर्माचारीही मिळत नाहीत. अशा वेळी २४ तास अंत्यसंस्कार कार्य सुरू ठेवणे अवघड जात आहे. यातून वादाचे प्रसंग तयार होत आहेत. यामुळे ही नवी नियमावली तयार केली आहे. नागरिकांनी याबाबत सहकार्य करावे. मात्र वैद्यकीय कारणासाठी तातडीने अंत्यसंस्कार गरजेचे असणाऱ्या पार्थिवांवरील अंत्यसंस्कारासाठी हा नियम लागू नाही. -राजेंद्र चोरगे, संस्थापक, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट,सातारा