ठराविक साच्यात आपल्या पाल्यांना तयार करणारी पालकांची मानसिकता अत्यंत संकुचीत असून त्यातून काही साधणार नाही. चाकोरीबद्ध शिक्षण प्रणालीतून आपण भावी पिढय़ांचे नुकसान करुन त्यांना खुरटे बनवत आहोत, असे प्रतिपादन डॉ. सुहास जेवळीकर यांनी केले.
गणेश वाचनालय, चौधरी मित्रमंडळ, इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने डॉ. मंजिरी चौधरी स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. जेवळीकर यांनी गुंफले. अध्यक्षस्थानी प्राचार्य रामदास डांगे होते. माणसाचा डावा मेंदू अत्यंत साधी-सोपी, तर उजवा मेंदू संशोधनासारखे काम करतो. आजच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तकातला मजकूर जसाच्या तसा शिकवला जातो. अशा शिकवण्यातून एकाच साच्याची मुले घडतात. त्यामुळे भारतात अव्वल दर्जाची बुद्धिमत्ता धारण करणारे विचारवंत निपजत नाहीत, असेही डॉ. जेवळीकर म्हणाले. डाव्या व उजव्या मेंदूचा सारखाच उपयोग करुन आपण आयुष्यात सव्यसाची बनले पाहिजे, असेही ते म्हणाले.
आपल्याला अनुभव नाही त्या विषयावर केवळ ‘गुगल’द्वारे माहिती मिळवून जाडजुड पुस्तके लिहिली जात आहेत, याकडे लक्ष वेधून डॉ. जेवळीकर यांनी अच्युत गोडबोले यांच्यावर टीका केली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डांगे यांनी समाजात ज्ञानलालसा वाढली पाहिजे, असे सांगून प्राचीन व संत वाङ्मयातील काही उदाहरणे दिली. कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत उमरीकर यांनी केले. डॉ. संध्या मानवतकर यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा