संदीप आचार्य, मुंबई

‘डॉक्टर, आमच्याबरोबर चला!’..हा आदेशच होता. डॉक्टरही एक शब्दही न बोलता आपली औषधाची बॅग घेऊन आलेल्या सशस्त्र माणसाबरोबर निघाले..जंगलात बराचवेळ चालल्यानंतर एके ठिकाणी झोपडीत त्यांना नेण्यात आले. तेथे आजारी असलेल्या एका व्यक्तीला त्यांनी इंजेक्शन दिले व काही औषधेही दिली. त्यानंतर पुन्हा डॉक्टरांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोडण्यात आले.

गडचिरोलीतील दुर्गम नक्षलग्रस्त भागातील आरोग्य विभागाच्या प्राथमिक केंद्रांमधील डॉक्टरांसाठी हा अनुभव अपवादात्मक असला तरी रात्रीच्या वेळी अनेकदा नक्षलवादी उपचारासाठी येत असतात.

ज्या कुरखेडा तालुक्यात हा स्फोट घडला तेथेच मालेवडा हे प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथील नक्षलींचा प्रभाव असलेल्या भागातील डॉक्टर, परिचारिका व त्यांचे कुटुंबीय भीतीच्या छायेत आहेत. गडचिरोलीतील ग्रामीण भागात आरोग्य विभागाची  ४७ प्राथमिक केंद्रे असून यातील १९ प्राथमिक केंद्रे ही नक्षलींचा प्रभाव असलेल्या दुर्गम भागात आहेत. कोर्ची, कुरखेडा, एटापल्ली, भामरागड, अहिरी व सिरोंचा या भागातील या आरोग्य केंद्रांवर काम करणे हे दिव्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यातील काही डॉक्टरांनी सांगितलेले अनुभव धडकी भरवणारे आहेत. बहुतेक वेळा उपचारासाठी नक्षलवादी रात्री येतात. सशस्त्र असलेल्या या लोकांना तपासून औषधोपचार करावेच लागतात. कधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दारावर रात्रीच्या वेळी चिठ्ठी लावण्यात येते. या चिठ्ठीत त्यांना हव्या असलेल्या औषधांची यादी असते. यादीप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी औषधे पाठवून द्यावी लागतात, असेही एका डॉक्टरने सांगितले.

गडचिरोलीतील दुर्गम स्थिती लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कायम पुरेसा औषधसाठा राहील याची काळजी घेतली जाते. काही ठिकाणी डॉक्टर नसले तरी पर्यायी व्यवस्था करून उपचार केले जातात. नक्षलवाद्यांकडून डॉक्टरांना कोणताही त्रास दिला जात नाही तसेच गावागावातील लसीकरणासह उपचारात कोणतेही अडथळे आणले जात नाहीत.

– डॉ. अर्चना पाटील,हंगामी आरोग्य संचालक

Story img Loader