कंत्राटदार-पोलीस संबंधांच्या चौकशीची गरज, गडचिरोलीतील स्फोट प्रकरण
नागपूर : गडचिरोलीतील दादापूर येथे रस्ता बांधकामातील ३६ वाहने नक्षलवाद्यांकडून जाळण्यात आली. या वाहनांची आग विझली नसताना घटनेच्या दुसऱ्याच दिवशी कुरखेडय़ाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना घटनेचा पंचनामा करण्याची घाई का झाली, असा सवाल पोलीस वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे. कंत्राटदारांना विम्याचा लाभ मिळायला हवा म्हणून लवकर पंचनामा करून देण्याचे तर त्यांचे प्रयत्न नव्हते ना, याचीही चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा-लेंडारी मार्गावर १ मे रोजी नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १५ पोलीस शिपाई शहीद झाले. नागपूर-राजनांदनगाव या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असलेल्या या मार्गाचा काही भाग नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ातून जातो. कुरखेडा येथील पुराडा-मालेवाडा-येरकडदरम्यान रस्ता तयार करण्याचे कंत्राट छत्तीसगड राज्यातील अमर कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. कंपनीचे कामगार व वाहने दादापूर येथे होती.
३० एप्रिलच्या रात्री शेकडो नक्षलवाद्यांनी दादापूरला घेराव घालून रस्ता बांधकामासाठी वापरण्यात येणारी ३६ वाहने जाळली. या घटनेची माहिती मिळताच कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) शैलेश काळे यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने दुचाकीवरून पुराडापर्यंत फेरफटका मारला. त्यानंतर भ्रमणध्वनी करून दादापूर परिसरात अभियान राबवणे व पंचनामा करण्याच्या उद्देशाने कुरखेडा येथून शीघ्र कृती पथक बोलावून घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलीस पुराडय़ाच्या दिशेने निघाले आणि नक्षलवाद्यांनी रचलेल्या सापळ्यात अलगद सापडले. एरवी, गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांकडून पोलीस खबऱ्या समजून अनेक गावकऱ्यांना संपवण्यात येते. लोकांचा जीव गेलेला असला तरी नक्षलवाद्यांचा सापळा असू शकतो म्हणून एक ते दोन दिवस उलटल्यानंतरच घटनेचा पंचनामा केला जातो. पण, दादापूर येथे एका खासगी कंपनीची वाहने जाळण्यात आली होती. तेथे कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. तरीही एसडीपीओ काळे यांनी पंचनाम्यासाठी एवढी घाई का केली, असा सवाल पोलीस वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे.
नक्षलवादी एका ठिकाणी दोन दिवस सापळा लावून बसत नाहीत, याची माहिती गडचिरोलीतील साध्या शिपायालाही आहे. शिवाय पुराडा परिसरातील जंगल अतिशय घनदाट नसून उन्हाळ्यामुळे अधिकच विरळ झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नक्षलवादी दोन दिवस सापळा रचून बसणे तसेही शक्यच नव्हते. केवळ कंत्राटदार कंपनीला लवकरात लवकर पंचनामा करुन देण्याच्या उद्देशाने काळे यांनी घाई केली असण्याच्या चर्चेला गडचिरोली पोलीस वर्तुळात पेव फुटले आहे. त्यामुळे काळे आणि कंत्राटदार कंपनींच्या प्रतिनिधींमधील संबंधही तपासण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही
पोलीस दलाने १५ जवान गमावले असून या घटनेत पोलीस कुठे चुकले हे तपासण्याची गरज आहे. कुरखेडय़ाचे उपविभागीय अधिकारी काळे यांनी घेतलेल्या निर्णयांचीही चौकशी व्हायला हवी. त्यांनी पंचनामा करण्याची इतकी घाई का केली, याबाबत अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. गडचिरोली-गोंदिया परीक्षेत्राचे उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रश्न ऐकल्यानंतर नंतर संपर्क करीत असल्याचे सांगितले, तर नक्षलविरोधी अभियानचे महानिरीक्षक शरद शेलार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण व्यस्त असल्याचा संदेश पाठवला.