जांभूळखेडा येथील भूसुरुंगस्फोटात १५ पोलीस शिपाई शहीद झाल्याप्रकरणी आणि दादापूर येथील रस्त्यांच्या कामावरील वाहनांची जाळपोळ या दोन्ही घटनांप्रकरणी जहाल नक्षलवादी कमांडर तथा नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख भास्कर व त्याच्या ४० साथीदारांविरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशद्रोह आणि अन्य कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गडचिरोलीतील कुरखेडाजवळ नक्षलवाद्यांनी मंगळवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील कंत्राटदाराच्या ३६ वाहनांची जाळपोळ केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर सकाळी ११ वाजता कुरखेडा येथून शीघ्रकृती पथक घटनास्थळाच्या दिशेने निघाले असता जांभुळखेडा-लेंडारी गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. त्यात हे जवान शहीद झाले.

या नक्षली हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला आहे. पुराडा पोलीस ठाण्यात भूसुरुंगस्फोट व जाळपोळ प्रकरणी जहाल नक्षली कमांडर तथा उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख नक्षली नेता भास्कर व त्याच्या ४० अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हत्या, गुन्हेगारी कट रचणे, देशद्रोह आणि बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीच्या हत्येचा बदल्याचा कट भास्करचा ?
उत्तर गडचिरोली विभागाची संपूर्ण सूत्रे ही नक्षली नेता भास्कर याच्याकडे आहे, तर त्याची पत्नी दक्षिण गडचिरोलीची नेता होती. मात्र २७ एप्रिलच्या चकमकीत भास्करची पत्नी रामको ठार झाली. यामुळे भास्कर चांगलाच संतापला होता. याच संतापाच्या भरात त्याने हा भूसुरुंगस्फोटाचा कट रचला असावा, अशीही चर्चा या भागात आहे. भास्करने पत्नीचा बदला घेतला, अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli naxal attack fir registered against naxalite bhaskar 40 others