गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंगस्फोटात १५ जवान शहीद झाले असतानाच नक्षलींची सुरक्षा दलाच्या पथकावर नजर होती, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला असून पोलिसांनी परिसरात शोधमोहीम देखील राबवायला सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले असून या घटनेने महाराष्ट्र दिनी पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. सुरक्षा दलाच्या पथकावर नक्षलींची नजर होती, अशी शक्यताही पोलीस दलातील सूत्रांनी वर्तवली आहे. दादापूर येथे वाहनांची जाळपोळ केल्यानंतर परिसरात नक्षलींचा वावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एका पोलीस कर्मचाऱ्याने याबाबतची माहिती जलद प्रतिसाद पथकातील जवानांना दिली. यानंतर जलद प्रतिसाद पथकातील जवान दादापूरच्या दिशेने निघाले.

कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला आणि यात चालक आणि १५ जवान शहीद झाले. सुरक्षा दलातील जवान खासगी वाहनाने येत असल्याची माहिती नक्षलींना आधीपासूनच होती आणि यानुसारच त्यांनी भूसुरुंग पेरले होते, अशी शक्यताही वर्तवली जात होते. सुरक्षा दलांच्या हालचालीची माहिती नक्षलींना कशी मिळाली, याचा देखील तपास सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli naxal attack naxalite might have inputs about security force movement