गडचिरोलीतील धानोरा तालुक्यामधल्या एका गावात गावकऱ्यांसोबत बैठक घेत असलेल्या नक्षलवाद्यांची पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन ग्रामस्थांसह आठ जण ठार झाले. शुक्रवारी दुपारी सुमारे पंधरा मिनिटे झालेल्या या चकमकीत पोलीस दलाचा एक जवान शहीद झाला असून चार मृत नक्षलवाद्यांमध्ये तीन महिला आहेत. गेल्या आठ दिवसांत जिल्हय़ात झालेली ही दुसरी भीषण चकमक आहे.
तालुक्यातील कालीपहाडीच्या पायथ्याशी असलेल्या सिंदसूर गावाजवळच्या जंगलात धानोरा दलमचे नक्षलवादी गावकऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी सकाळी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस दलातील सी-६० च्या पथकांनी दुपारी बाराच्या सुमारास बैठक घेत असलेल्या नक्षलवाद्यांना चारही बाजूने घेरले. हे लक्षात येताच पहारा देणाऱ्या नक्षलवाद्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यात गोविंद फरकाडे हा ४१ वर्षांचा जवान शहीद झाला. यानंतर जवानांनी प्रत्युत्तर देणे सुरू केले. सुमारे पंधरा मिनिटे चाललेल्या या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. यात तीन महिलांचा समावेश आहे.
या वेळी पोलिसांच्या गोळीबारात सुखदेव वारलू गावडे (२१) व कालिदास गुरकाई हिडको (२२) हे दोन आदिवासी तरुण ठार झाले. या चकमकीत आणखी एक गावकरी जखमी असून त्याच्यावर गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चकमकीत सामान्य नागरिक ठार झाल्याने या घटनेची दंडाधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावकऱ्यांचा उलट दावा
गावकऱ्यांसोबत बैठक सुरू असताना गोळीबार झाल्यामुळे दोन सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, गावकऱ्यांनी हा दावा खोडून काढला आहे. सिंदसूर गावातील पाच ते सहा नागरिक गुरकाई हिडको यांच्या शेताजवळ असलेल्या जंगलात फुले वेचत असताना नक्षलवादी आले व त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. भीतीपोटी गावकरी गावातून पाणी घेऊन गेले. नक्षलवाद्यांसोबत ते बसले असताना अचानक पोलिसांनी या सर्वाना घेरले आणि त्यानंतर चकमक सुरू झाली, असा दावा गावकऱ्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा