गडचिरोली जिल्हा परिषदेचा २०१५-१६ या आर्थिक वर्षांचा १४.६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज जिल्हा परिषद सभागृहात आयोजित विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे वित्त सभापती अतुल गण्यारपवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विजय मुळीक, मुख्य लेखा अधिकारी राऊत यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती उपस्थित होते.
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अतुल गण्यारपवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण व आरोग्य विभागाच्या निधीत कपात करण्यात आल्याचे सांगितले. एकूण १४ कोटी ६९ लाखाच्या या अर्थसंकल्पात शिक्षण विभागाचा निधी ७८ लाखांवरून ६१ लाख करण्यात आला. बांधकाम विभागासाठी १ कोटी १६ लाख ९५ हजाराची तरतूद करण्यात आली.
मात्र, सिंचन, कृषी, पशुसंवर्धन व समाजकल्याण विभागाच्या निधीत भरमसाठ वाढ करण्यात आली. सिंचन विभागासाठी ८ कोटी, कृषी विभागासाठी १ कोटी २४ लाख ८९ हजार, पशुसंवर्धन विभागासाठी ७० लाख, तर समाजकल्याण विभागासाठी १ कोटी ८१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.
ग्राम पंचायती सक्षम झाल्याने पंचायत विभागाचा निधी २५ लाखावरून एकदम १० लाखावर आणण्यात आला. तसेच आरोग्य विभागाचा ७० लाखाचा निधी ३४ लाख करण्यात आला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागालाही झुकते माप देण्यात आले.
गडचिरोली जि.प.चा १४.६९ कोटींचा अर्थसंकल्प
गडचिरोली जिल्हा परिषदेचा २०१५-१६ या आर्थिक वर्षांचा १४.६९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज जिल्हा परिषद सभागृहात आयोजित विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
First published on: 02-04-2015 at 07:02 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadchiroli zp budget