आपला पक्षनेतृत्वावर विश्वास असून जे काही चांगले व्हायचे ते कॉंग्रेसमध्येच होईल. मुख्यमंत्री पदाबाबत पक्ष नेतृत्वाकडून आपली फसवणूक झाल्याचा इन्कार उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिर्डीत साईदरबारी केला. पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांनी दिलेल्या अहवालावर राणे यांनी नाराजी व्यक्त करत त्यांचा निषेध करा, काळे झेंडे दाखवा, आंदोलन करा, असा इशारा सिंधूदुर्गमधील जिल्हा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर शिर्डी येथे शनिवारी आयोजित केले होते. यावेळी राणे यांनी मार्गदर्शन केले. खासदार डॉ. निलेश राणे, स्वाभीमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे, राजन तेली, संदिप सावंत आदी यावेळी उपस्थित होते. शिबिरानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माधवराव गाडगीळ यांचा अहवाल अंमलात आणला तर कोकणातील ११ जिल्ह्य़ांच्या विकासावरच गदा येणार असल्याने आपण त्या अहवालाची अंमलबजावणी होऊ देणार नाही. यासाठी केंद्राकडे जाऊ, प्रसंगी जनआंदोलन उभारू, असा इशारा राणे यांनी दिला. मंत्रिमंडळाचा फेरबदल ही टेबल न्यूज असून या बदलाबद्दल त्यांनी कानावर हात ठेवले. अजित पवार यांच्या राजीनाम्याचे व ते मंत्रिमंडळात नसल्याचे वाईट वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. कुणाचे वाईट झालेले बघून आनंद मानणाऱ्यांपैकी आपण नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता राणे यांनी फेटाळून लावली. १२६ वर्षे जुनी असलेल्या काँग्रेसला कुणी ओव्हरटेक करु शकत नसल्याचा दावा करतानाच उटसूट आरोप करणाऱ्या भाजपने आपले राज्यात काय चाललंय ते पहावे, असा सल्लाही दिला.    
राणे यांची फटकेबाजी
* पक्षनेतृत्वावर विश्वास असून जे काही व्हायचे ते कॉंग्रेसमध्येच होईल
* मुख्यमंत्री पदाबाबत नेतृत्वाकडून फसवणूक झाल्याचा इन्कार
* मंत्रिमंडळाचा फेरबदल ही टेबल न्यूज
* मध्यवर्ती निवडणुकांची शक्यता नाही
* काँग्रेसला कुणी ओव्हरटेक करु शकत नाही
* अजितदादांच्या राजीनाम्याचे व ते मंत्रिमंडळात नसल्याचे वाईट वाटते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gadgil report narayan rane protest
Show comments