काँग्रेस राजवटीत सुरू झालेल्या योजनांची नावे बदलवून केंद्रातील विद्यमान सरकार त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असताना नागपूरमध्ये मात्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मिहानमध्ये उभारण्यात आलेल्या विमान देखभाल दुरुस्ती केंद्राचे (एमआरओ) श्रेय घेताना त्यात काँग्रेसलाही वाटेकरी केले. यासाठी काँग्रेस नेत्यांनीही प्रयत्न केले होते, असे ते म्हणाले.
गडकरी यांनी शनिवारी मिहानमधील एअर इंडियाच्या या केंद्राला भेट देऊन त्याची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एमआरओमुळे नागपूर आंतरराष्ट्रीय नकाशावर आले आहे. येथील अभियंत्यांना रोजगाराची संधी मिळाली असून यातून विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच ते म्हणाले की, हा प्रकल्प केंद्रात काँग्रेस आघाडीच्या राजवटीत मंजूर झाला होता. तो नागपूरमध्ये यावा यासाठी तत्कालीन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यासह काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार, खासदार विजय दर्डा यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले. राज्यातील आघाडी सरकारचीही याला मदत मिळाली.
नागपूर हे देशाच्या मध्यस्थानी असल्याने आणि येथून विमानांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत असल्याने विमानाच्या देखभाल दुरुस्तीसाठी येथील एमआरओ विमान कंपन्यांसाठी सर्वात सोयीचा
ठरेल.
सध्या काही कंपन्यांना दुरुस्तीसाठी त्यांची विमाने दुबई, सिंगापूर, इंडोनेशियासह अन्य देशांत न्यावी लागतात. त्यामुळे इंधन आणि विदेशी चलनावर खर्च होतो. ही सोय येथेच उपलब्ध झाल्याने या दोन्ही गोष्टींची बचत होईल, असे गडकरी म्हणाले.
विदर्भातील अभियंत्यांना संधी द्या!
 नागपूरसह विदर्भासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. येथे लागणारे अभियंते, तंत्रज्ञ बाहेरून आणण्यापेक्षा विदर्भातील अभियंत्यांनाच प्रशिक्षित करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, तरच त्याचा फायदा होईल. याबाबत आपण संबंधितांना विनंती करू. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागण्यात आली आहे. ती मिळावी म्हणून आपण दिल्लीत प्रयत्न करू, असे गडकरी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा