नितीन गडकरींच्या अचानक पदत्यागामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला फटका बसेल अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात असली तरी नागपूरचा अपवाद वगळता इतरत्र फारसा फरक पडणार नसून भाजप संख्याबळ कायम राखेल असाच राजकीय पंडितांचा अंदाज आहे.
तीन वर्षांपूर्वीपर्यंत राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेले नितीन गडकरी यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अगदी अखेरच्या क्षणी दुसऱ्यांदा संधी मिळू शकली नाही. तेव्हापासून आता भाजपचे विदर्भात काय, असा प्रश्न चर्चिला जात आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काल दिल्लीत बोलताना भाजपला विदर्भात फटका बसेल, असे मत व्यक्त केल्याने या चर्चेला आणखी उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या आमदारांची विभागनिहाय आकडेवारी मोठी मजेशीर आहे. ठाणे वगळता कोकणाचा विचार केला तर भाजपचे या भागातून अवघे दोन आमदार आहेत. राज्याचे नेते असा लौकिक प्राप्त असलेल्या गोपीनाथ मुंडेंच्या मराठवाडय़ात दोन तर पश्चिम महाराष्ट्रात ११ आमदार आहेत. उत्तर महाराष्ट्रातून पक्षाचे ४ आमदार आहेत तर विदर्भातील आमदारांची संख्या १९ आहे. त्यामुळे राज्यस्तरावर राजकारण करणाऱ्या या पक्षाची खरी ताकद विदर्भात आहे हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. राज्यात भाजपचे ९ खासदार आहेत. त्यापैकी केवळ दोघे विदर्भातील आहेत.
गेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष नव्हते. तरीही त्यांना विदर्भात चांगले यश मिळाले. विशेषत: नागपूर जिल्हय़ात पक्षाच्या जागा वाढल्या. येत्या निवडणुकीतसुद्धा ते राष्ट्रीय अध्यक्ष राहणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या पदावर असण्या किंवा नसण्याने संख्याबळात फारसा फरक पडणार नाही असा तर्क राजकीय वर्तुळात सध्या मांडला जात आहे. राष्ट्रीय पातळीवर घडलेल्या घडामोडींमुळे गडकरी सध्या नाराज असले तरी निवडणुकीच्या आधी ते पुन्हा जोमाने सक्रिय होतील, असे भाजपच्या वर्तुळातून आता सांगण्यात येत आहे. पक्षाची धुरा राजनाथसिंह यांच्याकडे सोपवताना आता गडकरी व सिंह यांनी मिळून काम करावे, असा सल्ला संघाने दिल्याची माहितीसुद्धा भाजपच्या गोटातून देण्यात येत आहे. त्यामुळे गडकरी नेहमीसारखेच सक्रिय राहतील, असा अंदाज भाजपचे नेते आता बांधत आहेत.
पूर्व व पश्चिम विदर्भात अनेक जिल्हय़ांत भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. त्यामुळे गडकरी दिल्लीत असले काय किंवा नागपुरात असले काय, निवडणुकीत त्याचा फारसा फरक पडणार नाही, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला विदर्भात अपेक्षित यश मिळू शकले नाही.
आगामी निवडणुकीच्या काळात गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असते तर लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या विदर्भातील जागांमध्ये वाढ झाली असती असा युक्तिवादसुद्धा आता केला जात आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून नागपूर जिल्हय़ाच्या राजकारणावर गडकरींनी चांगला प्रभाव निर्माण केला आहे. याच बळावर येत्या लोकसभेची निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष असते तर नागपूरहून लढणे त्यांना अधिक सोपे गेले असते असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Story img Loader