गोव्यात शनिवारपासून सुरू होत असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी सहभागी होणार असले तरी पुढील वर्षी चार राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाचे प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची तयारी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, कार्यकारिणीतील राजकीय ठराव गडकरी मांडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
गडकरींच्या नजीकच्या वर्तुळातील सूत्रांनी दिलेल्या संकेतानुसार गडकरी यांनी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या चार राज्यांमधील प्रचाराची रणनीती आखण्याची जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट नकार कळविला आहे. नागपुरातील पूर्ती समूहावरील आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या गडकरींना राष्ट्रीय अध्यक्षपदावरून जावे लागले होते. तेव्हापासून त्यांनी फक्त महाराष्ट्र आणि विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांना राष्ट्रीय राजकारणात पुन्हा सक्रिय करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गेल्या २७ मे रोजी दूरध्वनी करून शुभेच्छा दिल्या होत्या. गेल्या महिन्यात नवी दिल्लीत गडकरी-अडवाणी यांच्यातील भेटीगाठींनी भाजपचे वर्तुळ ढवळून निघाले होते. अडवाणींनी भक्कम पाठबळ दिल्याने गडकरींवर चार राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली जाण्याची अटकळ बांधण्यात आली होती. परंतु, आपण एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच पक्षाचे काम करू, असे गडकरींनी सांगितल्याने नागपूर लोकसभा मतदारसंघातून जिंकून येण्यासाठी गडकरींची मोर्चेबांधणी आता निर्णायक टप्प्यावर असल्याचे संकेत मिळाले आहेत.
नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येणे गडकरींसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात ४५ टक्के मुस्लीम मते आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असतानाही या शहरातून काँग्रेसचा उमेदवार सलग पाच वेळा निवडून आला आहे. त्यामुळे आपल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीसाठी गडकरींनी मतदारसंघात चाचपणी सुरू केली असून, ही जागा भाजपच्या पारडय़ात पडण्याच्या दृष्टीने तळागाळातील कार्यकर्त्यांना आतापासूनच कामाला भिडवण्यात आले आहे. भाजपचे सदस्य नोंदणीचे लक्ष्य वाढविण्याची जबाबदारी शहराध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गोव्यात ८ आणि ९ जूनला होत असलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी नितीन गडकरी मुंबईला रवाना झाले असून तेथूनच गोव्याला जाणार आहेत.