भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड आणखी आठ दिवस लांबणीवर पडली असून या पदासाठी नितीन गडकरी यांचाच शब्द अंतिम राहील, असे दिल्लीतील नेत्यांनी स्पष्ट केल्याने विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनाच पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
नितीन गडकरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असे पर्यंत विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांची फेरनिवड निश्चित समजली जात होती. गडकरी यांना अचानक राजीनामा द्यावा लागल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलली. पक्षातील काही नेत्यांनी अचानक नागपूरचे आमदार देवेंद्र फडणवीस यांचे नाव समोर केले.
गडकरी राष्ट्रीय राजकारणात असेपर्यंत विजनवासात गेलेला राज्यातील गोपीनाथ मुंडे यांचा गट पुन्हा सक्रीय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यामुळे या महिन्याच्या प्रारंभी होणारी प्रदेशाध्यक्ष पदाची निवड लांबणीवर टाकण्यात आली. नंतर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाल्यानंतर नव्या अध्यक्षाचे नाव निश्चित करण्याचा अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्याकडे सोपवण्यात आले.
त्यांच्याकडून नाव निश्चित झाल्यानंतर १५ फेब्रुवारीपर्यंत नव्या अध्यक्षाचे नाव जाहीर होईल असे पक्षाच्या वर्तुळातून तेव्हा सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात आता ही घोषणा २० फेब्रुवारी नंतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवीन अध्यक्ष सर्व सहमतीने निवडला जावा, अशी अपेक्षा सर्वच नेत्यांकडून व्यक्त झाल्याने येत्या १६ फेब्रुवारीला नितीन गडकरी व गोपीनाथ मुंडे यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर नवीन अध्यक्षाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वात सुद्धा बदल झाला पाहिजे, अशी मागणी काही नेत्यांनी दिल्लीत केली होती.
मात्र, राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनी गडकरी हेच नव्या अध्यक्षाचे नाव निश्चित करतील असे राज्यातील नेत्यांना स्पष्टपणे सांगितल्याने आता या पदावर मुनगंटीवार यांची निवड होणार हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. गडकरी यांनी आरंभापासून मुनगंटीवारांच्या नावाचा आग्रह धरला आहे.
गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात मुनगंटीवारांनी सर्वाना सोबत घेऊन काम केले. आता निवडणुकांचा मोसम सुरू होणार असल्याने तेच अध्यक्ष हवेत, अशी गडकरींची भूमिका आहे. त्यामुळे २० फेब्रुवारीनंतर नव्या अध्यक्षाचे नाव सर्वसंमतीने जाहीर केले जाणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा