लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत. महायुतीत भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) या तीन पक्षांमध्ये ३२-१२-४ असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. दरम्यान, या कथित फॉर्म्युलावर शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकर यांनी संताप व्यक्त केला आहे. कीर्तिकर म्हणाले, या फॉर्म्युलाची अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच जागावाटपावर आमच्या पक्षासह आमच्या मित्रपक्षांमध्ये कोणते नेते चर्चा करत आहेत, काय चर्चा करत आहेत याची आम्हाला काहीच माहिती नाही. आमचे मुख्य नेते पक्षाची भूमिका ठरवताना माझ्याशी आणि आमच्या पक्षातील इतर नेत्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. परंतु, १२ जागांचा हा कथित प्रस्ताव आम्हाला अजिबात मान्य नाही.
गजानन कीर्तिकर म्हणाले, भाजपाने जागा द्यायच्या आणि आम्ही त्या घ्यायच्या अशी आमची परिस्थिती नाही. भाजपाने १२ जागा दिल्या म्हणजे आमच्यावर उपकार केले का? भाजपाने या गोष्टी चर्चा करून ठरवाव्या. आमच्या बाजूने कोण चर्चा करतंय, कोण निर्णय घेतंय हे काही आम्हाला माहिती नाही. या काळात चर्चा करताना आमचे प्रमुख नेते (एकनाथ शिंदे) शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करतील, अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही आमच्या १८ जागांवर ठाम असायला हवं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे १३ खासदार आले आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी योग्य संरक्षण दिलं पाहिजे. त्यांना राजकीय स्थैर्य मिळायला हवं. आमच्याबरोबर दगाफटका व्हायला नको. शिवसेना काय भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही. आम्ही तशी बांधू देणारही नाही. आमच्याबरोर दगाफटका होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे.
दरम्यान, गजानन कीर्तिकर यांनी महायुतीत शिवसेनेला किमान १८ जागा मिळायला हव्यात अशी भूमिका मांडली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या. यापैकी १८ जागांवर शिवसेनेचा उमेदवार जिंकला होता. दरम्यान, शिवसेना फुटल्यानंतर १८ पैकी १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले. तर ५ खासदार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. कीर्तिकर एबीपी माझाशी बोलत होते.
हे ही वाचा >> “घातपातासाठी पाठवलेला कार्यकर्ता…”, नाव न घेता मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर आरोप; म्हणाले, “मी त्याला…”
कीर्तिकर यांनी ३२-१२-४ या कथित फॉर्म्युलावर संताप व्यक्त केला. तसेच आम्हाला हा फॉर्म्युला मान्य नसून किमान १८ जागा मिळायला हव्यात अशी भूमिकाही त्यांनी मांडली. यावर कीर्तिकर यांना विचारण्यात आलं की, तुमच्या मनासारखं झालं नाही तर काय करणार? तुम्हाला अपेक्षित जागा न मिळाल्यास शिंदे गटाची भूमिका काय असणार? यावर खासदार कीर्तिकर म्हणाले, आम्ही काय करणार? तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं? आमच्याकडे प्लॅन बी वगैरे काही नाही. प्लॅन ए, प्लॅ बी वगैरे तुम्ही पत्रकारांनी तयार केले आहेत. परंतु, १८ जागा लढवण्यावर आम्ही ठाम आहोत. शिवसेना पक्षाचा नेता म्हणून मी यावर ठाम आहे. आमचा प्रमुख नेता काय म्हणतो मला माहिती नाही. हे केवळ माझं मत आहे. शिवसेनेचा नेता म्हणून मी माझं मत व्यक्त केलं.