मुंबईतील उत्तर-पश्मिच लोकसभा मतदारसंघावरून शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार गजानन कीर्तिकर आणि नेते रामदास कदम समोर-समोर ठाकले होते. कीर्तिकरांनी रामदास कदमांना ‘गद्दार’ उपमा दिल्याने दोन्ही नेत्यांमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं. पण, या वादावर कीर्तिकरांनी पडदा टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
‘एबीपी माझा’शी बोलताना गजानन कीर्तिकर म्हणाले, “रामदास कदम आरोप करतात म्हणून मी प्रत्युत्तर देणार नाही. याप्रकरणावर माझ्याकडून पडदा टाकण्यात आला आहे. मी माझ्या भावना मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर मला विश्वास आहे.”
हेही वाचा : शिंदे गटात वचक ना नेत्यांवर, ना आमदारांवर
“आम्हीच भांडत बसलो, तर शिवसैनिकांपर्यंत चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे रामदास कदमांनी कितीही टीका केली, तर मी कुठलंही भाष्य करणार नाही. तसा शब्द एकनाथ शिंदेंना दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हा दोघांना चर्चेसाठी बोलावलं, तर माझी तयारी आहे,” असं गजानन कीर्तिकरांनी म्हटलं.
हेही वाचा : उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गटात वाद उफाळला, गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांना सुनावलं
नेमका वाद काय?
रामदास कदमांनी पहिल्यांदा मुंबईतील उत्तर-पश्मिच लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तिकरांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला, तर पूत्र सिद्धेश कदम लढवेल, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर गजानन कीर्तिकरांनी प्रसिद्धीपत्रक काढत रामदास कदमांवर हल्लाबोल केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना रामदास कदमांनीही कीर्तिकरांवर वैयक्तिवर पातळीवर जाऊन टीका केली होती.