ठाकरे गटाचे एक खासदार संजय राऊत तुरुंगातून जामिनावर सुटून आल्यामुळे गटाची ताकद वाढल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्याचवेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी किर्तीकर यांच्या येण्यामुळे शिंदे गटाला मोठा फायदा होईल, अशा आशयाची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, किर्तीकर शिंदे गटात गेल्यानंतर त्यांची ठाकरे गटाकडून नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रवेशानंतर बोलताना गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांमध्ये टीकास्र सोडलं.
गेल्या काही दिवसांपासून गजानन किर्तीकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात होतं. शिंदे गटाप्रमाणेच किर्तीकर यांनीही अनेकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळालं होतं. अखेर शुक्रवारी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.नुकत्याच झालेल्या लोकाधिकार समिती महासंघ कार्यालयाच्या उद्घाटनाला किर्तीकर अनुपस्थित राहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
शिंदे गटात का दाखल झालात? किर्तीकर म्हणतात…
दरम्यान, उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यामागचं कारण गजानन किर्तीकर यांनी टीव्ही ९ शी बोलताना सांगितलं आहे. “एका योग्य मार्गाने शिवसेना नेण्याचा एकनाथ शिंदेंचा मानस आहे. तो मला स्पष्ट दिसला. शिवसेनेचे, बाळासाहेबांचे हिंदुत्वाबाबतचे, मराठी माणसाचे विचार त्यांनी अंगीकारले. त्यावर ते मार्गक्रमण करत आहेत. त्याबद्दल माझ्या मनात आकर्षण निर्माण झालं. खऱ्या अर्थाने ते बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेत आहेत. या आपुलकीने मी या संघटनेत प्रवेश केला”, असं गजानन किर्तीकर म्हणाले.
“…म्हणून मी थांबलो होतो”
“आम्ही सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत सोडा. सगळ्या खासदारांनी हे सांगितलं होतं. पण त्यानंतरही धोरणात काही बदल होत नाही म्हणून ते १२ खासदार गेले. मी यासाठीच थांबलो होतो की काही बदल होतो का? ते पाहावं. आपण उडी मारायची आणि आपण सांगायचं समेट करा, राष्ट्रवादी सोडा असं नको म्हणून थांबलो. पण या धोरणात काही बदल झाला नाही”, असं किर्तीकर यांनी स्पष्ट केलं.
ठाकरे गटाला मोठा धक्का! खासदार गजानन किर्तीकर शिंदे गटात सामील
“समेट करा असं आम्ही सांगितलं होतं, पण..”
“समेट करा असंही आम्ही सांगितलं. दोन्ही शिवसेनांचा दसरा मेळावा एवढ्या भव्यदिव्य ताकदीने झाला. मुंबईत एका दिवशी एवढी ताकद एकवटली, जर या दोन शक्ती एकत्र आल्या, समेट घडला तर शिवसेना किती मोठी होऊ शकेल. या सगळ्याची आम्ही वाट पाहात होतो. पण उद्धव ठाकरेंचं यासंदर्भात कुठलं मत आम्हाला दिसलं नाही. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा प्रवास उद्धव ठाकरेंनी थांबवायला हवा होता. पण ते काही आम्हाला दिसलं नाही”, असंही किर्तीकर म्हणाले.